

आकुर्डी: निगडी-आकुर्डी प्राधिकरण प्रभाग क्रमांक 15 मध्ये पाणीपुरवठा विभागामार्फत काही भागात नियमित तर काही भागात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे दाट लोकवस्तीच्या भागांमधील नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच प्रभाग क्रमांक 15 च्या निगडी-आकुर्डी प्राधिकरण भागात दूषित व गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खोदकाम करताना जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले
सध्या शहरामध्ये अनेक ठिकाणी विकासकामांनी जोर धरला असून, सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात आहे. यातच योग्य ती खबरदारी न घेतल्याने काही ठिकाणी जलवाहिनी फुटून अनेक वेळा लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जाते. तसेच, काही ठिकाणी खोदकाम करताना जलवाहिनी फुटत आहे. त्याची दुरुस्ती न झाल्याने जलवाहिनीतून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. (Latest Pimpri News)
निगडी व आकुर्डी प्राधिकरण प्रभाग क्रमांक 15 मध्ये याचप्रमाणे अनेक दिवसांपासून गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत माजी उपमहापौर शैलेजा मोरे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर ही समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.
पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याची वाणवा
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून पिंपरी चिंचवड परिसरात 24 तास पाणीपुरवठ्याच्या घोषणा केल्या जातात. मात्र, सध्या पावसाळ्याचे दिवस असूनही शहरातील अनेक भागांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातही काही भागांमध्ये दूषित व गढूळ पाणी पुरवठा झाल्याने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन गंभीर धोका होऊ शकतो. याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येमुळे प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.