Bhosari Open Bar Action Pudhari
पिंपरी चिंचवड

Bhosari Open Bar Action: भोसरीतील ‘ओपन बार’ला पोलिसांचा दणका! पीएमटी चौकातील १८ टपऱ्या हटविल्या; १७९ गुन्हे दाखल

भोसरीतील पीएमटी चौक परिसरात ‘ओपन बार’ संस्कृतीविरोधात पोलिस आणि महापालिकेने संयुक्त कारवाई केली. उघड्यावर मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या १८ अनधिकृत टपऱ्या हटविण्यात आल्या असून १७९ गुन्हे दाखल झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: रस्त्यालगतच्या टपऱ्यांवर उघड्यावर मद्यपान करण्यासाठी जागा आणि साहित्य उपलब्ध करून देत निर्माण झालेल्या ‘ओपन बार’ संस्कृतीविरोधात भोसरी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

पीएमटी चौक परिसराची पाहणी करून अशा प्रकारचे ‘हॉटस्पॉट’ निश्चित करण्यात आले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या मदतीने बुधवारी (दि. १६) संयुक्त कारवाई करत १८ अनधिकृत टपऱ्या हटविण्यात आल्या.

पीएमटी चौक हा भोसरीतील वर्दळीचा परिसर आहे. दिवसभर येथे कामगार, महिला, पादचारी आणि स्थानिक नागरिकांची मोठी ये-जा असते. मात्र, काही टपऱ्यांच्या आसपास सायंकाळनंतर उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांची गर्दी होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे वारंवार येत होत्या.

काही टपरीचालकांकडून मद्यपींना बसण्यासाठी जागा, ग्लास तसेच इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जात असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.

या तक्रारींची दखल घेत भोसरी पोलिसांनी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. कोणत्या ठिकाणी उघड्यावर मद्यपानाचे प्रकार वारंवार घडतात, कोणत्या टपऱ्यांभोवती मद्यपींची गर्दी होते आणि त्यामुळे नागरिकांना कुठे त्रास सहन करावा लागतो, याची माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर संबंधित ठिकाणे ‘हॉटस्पॉट’ म्हणून निश्चित करून कारवाईचे नियोजन करण्यात आले.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांनी पीएमटी चौक परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली.

मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या १८ टपऱ्या हटविण्यात आल्या. या कारवाईमुळे रस्त्यालगतचा परिसर मोकळा झाला असून, नागरिकांच्या वर्दळीला होणारा अडथळाही कमी झाला आहे.

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई

केवळ टपऱ्या हटविण्यावर कारवाई थांबणार नसून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी मोहीम सुरू ठेवली आहे. १ जानेवारीपासून आतापर्यंत अशा प्रकरणांत १७९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढेही ज्या ठिकाणी उघड्यावर मद्यपान होत असल्याचे आढळेल, त्या ठिकाणी संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

अन्य ‘हॉटस्पॉट’ही रडारवर

पीएमटी चौकातील कारवाईनंतर भोसरी परिसरातील इतर ठिकाणांवरही पोलिसांकडून लक्ष ठेवले जाणार आहे. टपरी, हातगाडी किंवा अन्य ठिकाणी उघड्यावर मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

त्यासाठी पोलिसांकडून परिसरनिहाय पाहणी करून अशा ठिकाणांची माहिती संकलित केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपानामुळे शिवीगाळ, वाद, मारामारी तसेच महिला आणि नागरिकांना त्रास होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे अशा ठिकाणांवर वेळीच कारवाई करून संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यावर पोलिसांचा भर राहील.

नागरिकांनी माहिती द्यावी

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, अवैध धंदे आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या घटकांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परिसरात अशा प्रकारे उघड्यावर मद्यपान होत असल्यास किंवा टपरीचालकांकडून त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्यास त्याची माहिती नागरिकांनी तत्काळ द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास होईल, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. पोलिसांकडून अशा ठिकाणांची पाहणी करून हॉटस्पॉट निश्चित केले जात आहेत. संबंधितांवर यापुढेही सातत्याने कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही अशा ठिकाणांची माहिती पोलिसांना द्यावी.
- मारुती जगताप, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT