पिंपरी: माहिती अधिकारातून कागदपत्रे काढल्याची भीती दाखवून भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीला तब्बल पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी वेठीस धरणाऱ्या ठाण्यातील चौघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दणका दिला. मागील सहा महिन्यांपासून कंपनीच्या प्रतिनिधींवर दबाव टाकत 'पैसे दिले नाहीत, तर कंपनीची वाट लावू आणि जिवे मारू', अशी धमकी देण्यात आली. अखेर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार खंडणीविरोधी पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून २५ लाख रुपयांची रोकड असलेली काळ्या रंगाची बॅग स्वीकारताच पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या. राहुल प्रेमनारायण मिश्रा (वय ३८), अल्ताफ उस्मान जानवेकर (वय ५३), रमेश भrमा मांजरेकर (वय ३९) आणि सुनील राजेंद्र कानू (वय ३५, सर्व रा. ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कंपनीच्या प्रतिनिधीने फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची भोसरी एमआयडीसीमध्ये कंपनी आहे. दरम्यान, मागील सहा महिन्यांपासून आरोपींनी कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. माहिती अधिकारातून कंपनीच्या कामासंदर्भातील कागदपत्रे मिळवल्याचे सांगत त्यांनी कामात त्रुटी असल्याचा दावा केला. त्याआधारे कंपनीच्या कामावर कारवाई घडवून आणण्याची भीती दाखवून सुरुवातीला पैशांची आणि हप्त्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर 'महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर पाच कोटी रुपये द्यावे लागतील,' अशी मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास कंपनीचे नुकसान करण्यासह कंपनीशी संबंधित व्यक्तींना जिवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. तसेच, आरोपींनी ई-मेलच्या माध्यमातूनही धमक्या दिल्या. फिर्यादी यांनी संबंधित ई-मेल, संभाषणाचे रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध करून दिले आहेत.
शहरातील व्यावसायिक आणि उद्योजकांना धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याच्या सूचना पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला दिल्या आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्यांना गुन्हेगारी प्रवृत्तींकडून त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे तसेच खंडणी मागणाऱ्यांची कोणतीही गय करू नये, असे त्यांच्या आदेशात नमूद आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यावसायिकाने ठाण्यातील काही जण खंडणीसाठी त्रास देत असल्याची माहिती पोलिस आयुक्त चौबे यांच्यापर्यंत पोहचवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत चौबे यांनी पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना जेरबंद केले.
काळ्या बॅगेत स्वीकारले २५ लाख
ठरल्याप्रमाणे पोलिसांनी कंपनी परिसरात साध्या वेशात सापळा रचला. आरोपी पैसे घेण्यासाठी मारुती सुझुकी कारमधून तेथे पोहचले. खंडणीच्या रकमेबाबत चर्चा झाल्यानंतर राहुल मिश्रा याने फिर्यादीकडून २५ लाख रुपयांची रोकड असलेली काळ्या रंगाची बॅग स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या खंडणीविरोधी पथकाने झडप घालून आरोपींना ताब्यात घेतले.
तक्रार देण्याचे आवाहन
पोलिसांनी २५ लाखांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी कार तसेच आरोपींकडील मोबाईल ताब्यात घेतले आहेत. आरोपींचे परस्परांशी असलेले संबंध, या प्रकरणातील प्रत्येकाची नेमकी भूमिका, त्यांना मदत करणारे मध्यस्थ तसेच यापूर्वी त्यांनी अन्य उद्योजक किंवा व्यावसायिकांकडून अशाच पद्धतीने खंडणी उकळली आहे का? याचा तपास करण्यात येत आहे. अशाप्रकारे कोणी खंडणी मागत असल्यास न घाबरता तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी या माध्यमातून केले आहे.
औद्योगिक परिसरातील उद्योजक, व्यावसायिक तसेच विविध आस्थापनांना धमकावणे, त्यांच्यावर दबाव निर्माण करून पैशांची मागणी करणे किंवा गुन्हेगारी टोळ्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. अशा तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. औद्योगिक विकासाला बाधा आणणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांचे 'झिरो टॉलरन्स' धोरण कायम असणार आहे.रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड