Gas Shortage Impact Pudhari
पिंपरी चिंचवड

Bhosari Gas Cylinder Shortage: भोसरीत गॅस सिलिंडर टंचाई; नागरिक त्रस्त, चुलीवर स्वयंपाकाची वेळ

25 दिवस प्रतीक्षा; घरगुती व व्यावसायिकांना फटका, प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

भोसरी: गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने गृहणी मेटाकुटीला आल्या असून दैनंदिन स्वयंपाकाचे नियोजन कोलमडले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी घरासमोर चुली उभारून लाकडे जाळून स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. आधुनिक सुविधांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना पुन्हा पारंपरिक पद्धतीचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र भोसरी परिसरात दिसून येत आहे.

भोसरी परिसरात सिलिंडर टंचाईमुळे नागरिक हैराण आहेत. त्यात भर की काय गॅस बुकिंग केल्यानंतरही सिलिंडर वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ताबडतोब मिळणारे सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने महिलांचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक ठिकाणी रोजच्या जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय होत असून आरोग्यावरही त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

व्यावसायिकांवर बंद ठेवण्याची वेळ

व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल, हातगाडीवर आणि खानावळ व्यवसायिकांना ही या टंचाईचा मोठा फटका बसला आहे. गॅस अभावी अनेकांनी व्यवसाय मर्यादित केला असून काहींना तात्पुरते हॉटेल बंद ठेवावे लागत आहे. वाढत्या खर्चामुळे आणि अनिश्चित पुरवठ्यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. नागरिकांनी संबंधित प्रशासन आणि गॅस वितरण कंपन्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. गॅस पुरवठा सुरळीत करावा तसेच वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शेजारधर्माला तिलांजली

नेहमी शेजारधर्म पाळून एकमेकांना मदत करणारे नागरिकही आता हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी गरज पडल्यास सहजपणे सिलिंडर देणारे हात आता मागे सरकताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी केवळ विचारपूस केली जात असून, प्रत्यक्ष मदत मिळत नाही. पुरवठ्यातील अडचणी आणि वाढती मागणी यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.

शहरात गॅस सिलिंडरच्या वाढत्या टंचाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. पूर्वी सिलिंडर बुक केल्यानंतर अवघ्या 24 तासांत घरपोच मिळत होता. मात्र, सध्या परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, नागरिकांना तब्बल 25 दिवस वाट पाहावी लागत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी फक्त बुकिंग स्वीकारले जात आहे, परंतु सिलिंडर कधी मिळणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती किंवा मेसेज दिला जात नाही. यामुळे नागरिक चिंतेत आहेत.
साहेबराव लांडगे, नागरिक
ईकेवायसी केलेल्या नागरिकांना सिलिंडर देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. शोरूम आणि गोडाऊनमध्ये सिलिंडर डिलिव्हरी मिळणार नाही. त्यांना नेहमीप्रमाणे घरपोच सिलिंडर दिले जाणार आहेत.
गॅस वितरक
सिलिंडर मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून हॉटेल बंद ठेवण्यात आले आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग््रााहकांची देखील गैरसोय होत आहे. टंचाईमुळे दर वाढले आहेत.
संजय लांडे, हॉटेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT