विजय जगदाळे
भोसरी: भोसरी-दिघी रस्त्याचे सुरू असलेले काँक्रिटीकरणाचे काम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे वाहतूककोंडी, धुळीचे प्रदूषण आणि सुरक्षेच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. तोंडावर आलेला पावसाळा आणि अद्याप अपूर्ण असलेले रस्त्याचे काम यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. भोसरी-दिघी रस्त्याचे काम अखेर पूर्ण कधी होणार? असा संतप्त सवाल नागरिक पालिका प्रशासनाला विचारू लागले आहेत.
१२७० मीटर लांबीचा गंगोत्री पार्क ते राजमाता जिजाऊ उड्डाण पुलापर्यंत प्रभाग क्रमांक ७ व प्रभाग क्रमांक ५ या दोन प्रभागातून हा रास्ता जात आहे. भोसरी-दिघी हा शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असून, या मार्गावरून दररोज दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहतूक करणारी वाहने ये-जा करतात. याच परिसरात शाळा, बाजारपेठ, व्यावसायिक आस्थापने आणि विविध दुकाने असल्याने दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते; परंतु मागील काही महिन्यांपासून या रस्त्याचे कासव गतीने काम सुरू असल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सूचना फलकाचा अभाव
रस्त्याच्या कामादरम्यान आवश्यक सूचना फलक, पर्यायी मार्गदर्शक फलक आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे रस्त्याचे काम करताना पादचारी, वाहनचालक यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याने नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे; परंतु महापालिकेचे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग
रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी वाहने एकाच मार्गावरून वळवावी लागत आहेत. परिणामी सतत वाहतूककोंडी होत असून, वाहनचालकांमध्ये किरकोळ कारणांवरून वादाचे प्रसंगही घडत आहेत. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होते. काँक्रिटीकरणाच्या कामामुळे रस्त्यावर धूळ उडत असून, त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, नियमित पाणी फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाहनांना घडताहेत अपघात
काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील खड्ड्यात एक चारचाकी वाहन अडकल्याची घटना घडली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अशा घटना प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटीमुळे घडत असल्याचे नागरिक सांगतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, आवश्यक सूचना फलक लावावेत, धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.
भोसरी-दिघी रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचा दर्जाबद्दल शंका आहे. अनेक ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सूचनाफलक नसल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होते. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. संपूर्ण रस्त्यावर कुठेही नागरिकांच्या सुरक्षेबद्दल काळजी घेतली नाही.अनिल फुगे, नागरिक