Bhama Askhed Pudhari
पिंपरी चिंचवड

Bhama Askhed Water Supply Project: पिंपरी-चिंचवडकरांना मार्चमध्ये मिळणार १६७ एमएलडी अतिरिक्त पाणी; भामा-आसखेड योजना अंतिम टप्प्यात

जानेवारी २०२७ अखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन; फेब्रुवारीत पाण्याची चाचणी, सात वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मागील सात वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा त्यात सध्या दहा टक्के पाणी कपातीला पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना भामा आसखेड धरणातून नवीन वर्षात मार्च महिन्यात 167 एमएलडी पाणी मिळणार आहे. या योजनेचे काम जानेवारी 2027 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. थेट धरणापासून भूमिगत जलवाहिनीद्वारे मिळणाऱ्या स्वच्छ अतिरिक्त पाण्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यानुसार पाण्याची मागणीही वाढत आहे. मात्र, उपलब्ध पाणीसाठा आणि वाढती मागणी यांचा ताळमेळ घालताना महापालिका प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना अपुऱ्या व अनियमित पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. पाणी कपातीमुळे नागरिकांची गैरसोय होत असून, नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून अतिरिक्त मिळणाऱ्या पाण्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहेत. या योजनेतून 167 एमएलडी पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येणार आहे. जुन्या ठेकेदाराकडून काम काढून घेऊन उर्वरित कामासाठी नव्याने ठेकेदार नेमण्यात आले आहेत. ते काम दोन टप्प्यात करण्यात असून, ते मुदतीमध्ये पूर्ण कररण्यावर भर देण्यात आला आहे.

ते अतिरिक्त पाणी शहराला उपलब्ध झाल्यास शहराच्या एकूण पाणीपुरवठ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवरील ताण कमी करण्यास मदत होईल. तसेच, पाणी कपातीचे नियोजन बदलणे किंवा नागरिकांना अधिक नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.

दहा टक्के पाणी कपातीनंतर शहराला सध्यस्थितीत पवना धरणातून 520 एमएलडी, आंद्रा धरणातून 90 एमएलडी तर एमआयडीसीकडून 25 एमएलडी असा 635 एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. परंतू, त्यानंतरही शहरातील विविध भागातून अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

मुळशी धरणातील पाणी देण्यास जलसंपदा विभागाचा नकार

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुळशी धरणातून 760 एमएलडी पाणी आरक्षित करण्याची विनंती महापालिकेने जलसंपदा विभागाकडे सन 2023 मध्ये केली होती. या मागणीस नकार देत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला कळविले होते. त्या संदर्भात जलसंपदा मंत्र्यांसोबत महापालिका व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. मात्र, मुळशी धरणातून पाणी देण्यास अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. पाण्याचे ऑडिट करून, गळती थांबण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेस केल्या आहेत.

जानेवारीत काम पूर्ण करून फेब्रुवारीत चाचणी घेणार

भामा-आसखेड पाणी योजनेच्या रखडलेल्या कामांसाठी नवीन ठेकेदाराच्या नियुक्तीनंतर कामाला वेग आला आहे. प्रत्यक्ष काम वेगात सुरू असून सातत्याने या कामाचा आढावा घेतला जात आहे. कामासाठीच्या मुदतीत ते पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. जानेवारी 2027 पर्यंत काम पूर्ण करून फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष पाण्याची चाचणी घेतली जाईल. मार्चमध्ये शहराला वाढीव 167 एमएलडी पाणी मिळेल, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT