Ancient Hanuman Idol Bhadalwadi Pudhari
पिंपरी चिंचवड

Ancient Hanuman Idol Bhadalwadi: बधलवाडीतील मंदिर उत्खननात उघडकीस आली प्राचीन हनुमान मूर्ती

पाया घेताना तब्बल 7-8 फूट खोल सापडली अद्वितीय ‘चपेटदान मुद्रा’ दर्शविणारी अडीच फूट उंच मूर्ती; इतिहास संशोधकांची प्राथमिक पडताळणी

पुढारी वृत्तसेवा

नवलाख उंबरे : बधलवाडी येथील हनुमान मंदिराचे पुनर्निर्माण सुरू असताना पाया खोदताना साधारण 7 ते 8 फूट खाली एक प्राचीन हनुमान मूर्ती आढळून आली. ही माहिती नवलाख उंबरे गावचे माजी उपसरपंच रवींद्र कडलक, ग्रामस्थ सोपान दहातोंडे आणि सचिन रौधळ यांनी इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांना दिली. त्यानंतर प्राथमिक अभ्यासात या मूर्तीचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट झाले.

उत्खननात सापडलेली मूर्ती ‌‘चपेटदान मुद्रा‌’ दर्शविते. मारुती चापटी मारण्याच्या पवित्र्यात दाखवले असता त्या मूर्तीला चपेटदान मुद्रा असे संबोधले जाते. ही मूर्ती अखंड असून कुठेही भग्नावशेष नाहीत. जमिनीखाली सुमारे शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ दडलेली असली तरी तिची झीज अत्यल्प आहे. अडीच फूट उंचीची, अखंड शिळेवर कोरलेली ही मिशिधारी मूर्ती अत्यंत सुबक आणि देखणी आहे. दोन्ही हातात कडे-बाजूबंद, गळ्यात कंडा, पायात तोडे आणि कमरेला सोवळेसदृश पट्टा असून पायाखाली पनवती दाखवली आहे. सामर्थ्य व विजयाचे प्रतीक म्हणून पनवती दाखवण्याची परंपरा आजही कायम आहे. प्राथमिक संशोधनानुसार ही मूर्ती अंदाजे 1850 च्या सुमारास निर्माण झालेली असावी, म्हणजे जवळपास पाऊणेदोन शतके जुनी असल्याचे इतिहास संशोधक प्रमोद बोराडे यांनी सांगितले.

सध्या नवलाख उंबरे परिसरातील अनेक जुनी आडनावे, घराणी आणि ऐतिहासिक वास्तू संशोधनातून समोर येत आहेत. या परिघात ज्यांच्याकडे मोडी लिपीत कागदपत्रे असतील त्यांनी ती संशोधकांसाठी उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन इतिहास संशोधकांकडून करण्यात येत आहे. मावळच्या इतिहासाला नवीन दिशा देणारी ही हनुमान मूर्ती सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

शिवकालीन इतिहासाचे जिवंत साक्षीदार असलेल्या या गावात भैरवनाथ मंदिर, भव्य नगारखाना, आंग्लकालीन राममंदिर, पायऱ्यांची विहीर, तलाव, खापरी नळाच्या पाणीपुरवठा योजना, तेलाचे घाणे, समाधी, रंगशीला, दीपमाळा व शिवकालीन बाजारपेठ यांसारख्या अनेक पुरातन वास्तू आजही पाहायला मिळतात. या गावाच्या शेजारी वसलेली बधलवाडी हीसुद्धा कालांतराने ऐतिहासिक रूपाने महत्त्वाची ठरली आहे.

मंदिराचा पाया घेताना मूर्ती सापडली, अशी माहिती आम्हाला ग्रामस्थांकडून मिळताच आम्ही ही माहिती तात्काळ इतिहास संशोधक प्रमोद बोराडे यांना दिली. गावाला असा प्राचीन वारसा लाभणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
रवींद्र कडक, माजी उपसरपंच, नवलाख उंबरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT