बारामती: जगात अशी काही ठिकाणे असतात, ती केवळ नकाशावरील बिंदू नसतात; तर प्रगती, बदल आणि संधींची शक्तिकेंद्र म्हणून ती ओळखली जातात. बारामती हे अशाच एका परिवर्तनाचे, अमर्याद शक्यता असलेले प्रतीक आहे. हे सर्व एक असामान्य असलेले नेते आणि माझे मार्गदर्शक शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन उद्योगपती गौतम अदानी यांनी केले. विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार होते. अदानी फाउंडेशनच्या प्रमुख डॉ. प्रीती अदानी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. सुनेत्रा पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे प्रमुख राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, नगराध्यक्ष सचिन सातव, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव नीलिमा गुजर, विश्वस्त मंदार सिकची, विठ्ठल मणियार, डॉ. राजीव शहा, उद्योगपती बी. जी. शिर्के, दीपक छाबिया आदींची या वेळी उपस्थिती होती.
अदानी म्हणाले की, सर्व क्षेत्रांतील अचूक माहिती शरद पवार यांना आहे. ते माझ्यासाठी नेहमीच आदरणीय व आदर्श राहिले आहेत. देशाच्या दीर्घकालीन राजकारणामध्ये शरद पवार यांनी खूप मोठे सामाजिक काम उभारले आहे. एआयसंबंधी बोलताना ते म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केवळ सोयी-सुविधांपुरता मर्यादित राहता उपयोगी नाही, तर त्याकडे आपण एक राष्ट्रीय सामर्थ्य म्हणून पाहिले पाहिजे. तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आमूलाग््रा परिवर्तन घडवत राष्ट्राला अधिक सशक्त बनविणारे तंत्रज्ञान म्हणून पुढे येईल. पहिल्या औद्योगिक क्रांतीने वाफेची ताकद, दुसऱ्या क्रांतीने वीज व उत्पादन, तिसरी क्रांती संगणक व इंटरनेटची होती. आता चौथी क्रांती ही एआयची आहे. औद्योगिक क्रांतीनंतर बिटनमध्ये रोजगार पाचपटीने वाढला. दुसऱ्या क्रांतीत उद्योग, व्यवस्थापन आणि दळणवळण वाढले. तिसऱ्या डिजिटलयुगाने लाखो नव्या नोकऱ्या, स्टार्टअप्स आणि उद्योग निर्माण केले. मोबाईल क्रांंतीतही तसेच झाले. 1991 ते 2024 च्या दरम्यान भारतात 230 दशलक्षांहून अधिक गैरकृषी नोकऱ्या वाढल्या. त्यातील बहुतेक नोकऱ्या या मोबाईल डेटा प्रसारानंतर वाढल्या आहेत. फ्लिपकार्ट पारंपरिक व्यापारातून नव्हे, तर मोबाईलच्या माध्यमातून भारतात जन्मली.
ओलाकडे स्वतःच्या गाड्या नव्हत्या. स्विगीकडे स्वतःचे किचन नव्हते. पण, त्यांनी संधी शोधली. पेटीएम, फोनपेबाबतही असेच घडले. मोबाईलच्या माध्यमातून हे बदल घडल्याचे अदानी म्हणाले. जेव्हा 1.4 अब्ज भारतीयांच्या हातात एआयचा वापर असेल तेव्हा प्रगती अत्यंत वेगाने व गुणाकाराने वाढेल. शेतकरी केवळ शेती करणारा नाही तर उद्योजक बनेल. माती विश्लेषणापासून ते बाजारभावापर्यंतचे गणित एआयवर आधारित असेल, असेही ते म्हणाले. देशातील महत्त्वाचे केंद्र बारामतीत साकारले जात आहे. त्याचे उद्घाटन अदानी यांच्या हस्ते होत असल्याचा आनंद असल्याचे सांगून ज्येष्ठ नेते खा. शरद पवार म्हणाले, गौतम अदानी देशात उद्योग क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव आहे. अनेक क्षेत्रांत त्यांची उड्डाणे आहेत. त्यांनी शून्यातून सुरुवात केली. गुजरातमध्ये पालमापूर हे त्यांचे गाव. तेथील मर्यादा लक्षात आल्यावर ते मुंबईला आले. खिशात काही नव्हते; पण मुंबईमध्ये जो कोणी कष्ट करतो, त्याला कधी उपाशी ठेवत नाही, त्याचा फायदा गौतमभाईंनी घेतला. कष्ट केले आणि उद्योग विस्तारत नेले. आज देशातील 23 राज्यांत त्यांचा व्यवसाय आहे. लाखो हातांना त्यांनी काम दिले आहे.
देशाचा नकाशा पाहिला तर चोहोबाजूने बंदरे आहेत. अदानी यांनी या देशात बंदर उभे केले. देशातील निम्मी विमानतळे आज या ग््रुापकडे आहेत. त्याद्वारे लाखो लोक दरदिवशी प्रवास करीत आहेत. काही लाख एकर जमीन त्यांनी घेतली असून, तेथे सोलरच्या माध्यमातून वीज तयार करीत मोठा बदल त्यांनी केला. जी व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करते अशा व्यक्तीचे कर्तृत्व नव्या पिढीला समजावे, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आज या ठिकाणी गौतमभाई आणि प्रीती अदानी यांना बोलावले असल्याचे ते म्हणाले.
डेटा सेंटरमुळे हजारो तरुणांना रोजगार मिळेल. त्यादृष्टीने त्यांचे काही काम चालू आहे. त्यांनी महाराष्ट्रात असा प्रकल्प करावा. त्यासाठी आवश्यक सुविधा अजित पवार आणि त्यांचे सहकारी देतील, असा विश्वास खा. शरद पवार यांनी व्यक्त केला. या वेळी खा. सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भाषणे झाली.