पिंपळे गुरव: सामान्य जनतेसाठी आधारवड मानले जाणारे सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णाला आयसीयूऐवजी सामान्य वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याने अखेर त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे.
संकेत रणजित सूर्यवंशी यांना श्वास घेण्यास तीव त्रास होत असल्याने त्यांना शुक्रवारी (दि. 6) औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असताना आणि त्यांना आयसीयू उपचारांची आवश्यकता असतानाही बेड उपलब्ध नाही, असे सांगत त्यांना सामान्य वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते.
रक्तस्राव सुरू; तरीही उपचारास विलंब
रुग्णाची बहीण साक्षी सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत सूर्यवंशी यांची प्रकृती गंभीर असतानाही त्यांच्यावर वेळेवर उपचार करण्यात आले नाहीत. शुक्रवारी रात्री उशिरा रुग्णाच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला होता. तसेच, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि ते अस्वस्थतेने तडफडत होते. या वेळी आम्ही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडे वारंवार मदत मागितली. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप साक्षी सूर्यवंशी यांनी केला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास रुग्णाची प्रकृती अधिकच गंभीर झाल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलविण्याची हालचाल करण्यात आली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. अखेर शनिवारी (दि. 7) सकाळी रुग्णाचा मृत्यू झाला.
नातेवाईकांची प्रशासनाकडे तक्रार
या घटनेनंतर संतप्त साक्षी सूर्यवंशी यांनी औंध जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. वेळेवर योग्य उपचार मिळाले असते तर संकेत सूर्यवंशी यांचा जीव वाचला असता असा आक्रोश नातेवाईकांनी व्यक्त केला.
औंध जिल्हा रुग्णालयातील उपचारातील हलगर्जीपणा, अपुरी व्यवस्था आणि प्रशासनाच्या कारभाराबाबत यापूर्वीही विविध माध्यमांतून तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, त्या गांभीर्याने घेतल्या गेल्या नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणातील दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल.मेघराज लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष, युवासेना
संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय