पिंपळे गुरव: ज्या ठिकाणी रुग्णांना जीवनदान मिळायला हवे त्या औंध जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच सध्या धुराचे सामाज्य पसरले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा संतापजनक नमुना समोर आला आहे. रुग्णालयाच्या परिसरातच रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर पसरत आहे. हा धूर केवळ पर्यावरणालाच नव्हे तर उपचारासाठी आलेल्या रुग्णांसाठी तसेच नागरिकांसाठी स्लो पॉयझन ठरत आहे. यामुळे येथून प्रवास करणारांचा जीव गुदमरताना दिसून आला.
दररोज शेकडो रुग्ण त्यांचे नातेवाईक डॉक्टर आणि कर्मचारी यांची या रुग्णालयात मोठी वर्दळ असते. मात्र, रुग्णालयाच्या परिसरातच धुराचे लोट उसळत असल्याने रुग्णांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. रुग्णालयाच्या परिसरातच कचऱ्याचे ढिगारे साचले असून, त्याला आग लागल्यामुळे प्लॅस्टिकसह विविध घातक पदार्थ जळत आहेत. त्यामुळे विषारी वायू मोठ्या प्रमाणात हवेत मिसळत असून, प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे या कचऱ्यात मुके जनावर अन्न शोधत असल्याचे चित्र दिसत आहे. प्लॅस्टिकयुक्त कचरा खाल्ल्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. परिसरात सुकलेली झाडे आणि विजेचे खांब असल्यामुळे आग पसरण्याचा धोका अधिक वाढला आहे. उन्हाच्या वाढत्या तीवतेमुळे ही आग मोठ्या दुर्घटनेत रूपांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णालयासारख्या अत्यंत संवेदनशील परिसरात कचरा जाळला जाणे हा केवळ हलगर्जीपणा नसून, गंभीर गुन्हा असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील क्षेत्रात कचरा जाळला जाणे हा केवळ निष्काळजीपणा नसून गुन्हा आहे. दोषींवर तातडीने कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
प्रशासनाला कधी येणार जाग?
प्रशासकीय अधिकारी नेमके काय करत आहेत? कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी असलेली यंत्रणा निष्क्रिय का झाली आहे? एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही का, असा रोखठोक सवाल आता उपस्थित केला जात आहे. कचऱ्याचे ढिगारे त्वरित हटवून उघड्यावर कचरा जाळण्याच्या प्रकारांवर कठोर बंदी घालावी. तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
औंध परिसरातील साचलेला कचरा उचलण्याचे काम आरोग्य विभागामार्फत नियमितपणे करण्यात येत आहे. परिसरातील साफसफाई रुग्णालयातील कर्मचारी करतात. ज्या ठिकाणी कचऱ्याला आग लागलेली आहे त्या ठिकाणी कर्मचारी पाठवून तात्काळ आग विझविण्यात येईल. पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत याबाबत दक्षता घेण्यात येईल.दीपक कोटियाना, मुख्य आरोग्य निरीक्षक, क्षेत्रीय कार्यालय
आम्ही येथे आजार बरा करायला येतो की नवीन आजार जडवून घ्यायला. रुग्णालय प्रशासनाला साधी आग विझवता येत नाही, कचरा हटवता येत नाही, हे दुर्दैव आहे. लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास होतोय याची जबाबदारी कोण घेणार.रुग्णाचे नातेवाईक