District Hospital Disabled Facilities Problem Pudhari
पिंपरी चिंचवड

District Hospital Disabled Facilities Problem: औंध जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांसाठीच्या सुविधा नावालाच; रुग्ण त्रस्त

रॅम्प, स्वच्छतागृह, पार्किंगची दुरवस्था; अडथळामुक्त वातावरण फक्त कागदावरच

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: पुणे जिल्हा रुग्णालयात (औंध) उपचार आणि प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या दिव्यांगबांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शासनाने अडथळामुक्त वातावरणाचा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात जिल्हा रुग्णालयातील सुविधांची दुरवस्था पाहून प्रशासनाचे दिव्यांगांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.

दिव्यांगांना ये-जा करणे झाले धोकादायक

रुग्णालय परिसरात दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या असल्या तरी त्या केवळ नावालाच असून, प्रत्यक्षात त्यांचा उपयोग होत नसल्याने दिव्यांगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रॅम्प असला तरी त्याठिकाणी सुरक्षिततेसाठी ग््राील किंवा आधार देणारे बार नाहीत. रॅम्पसाठी वापरण्यात आलेल्या गुळगुळीत टाइल्समुळे दिव्यांगांना आधाराशिवाय ये-जा करणे धोकादायक ठरत आहे. काही ठिकाणी रॅम्पचे दरवाजे कायमस्वरूपी बंद असल्याचेही निदर्शनास आले आहे. लिफ्टजवळील रॅम्पचे ग््राील तुटलेले असून, ते दुरुस्त करण्यात आलेले नाही.

स्वच्छतागृहांची दुरवस्था

दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय दाखवली असली तरी त्या जागांवर सर्वसामान्य वाहनधारकांची वाहने उभी केली जातात. यामुळे दिव्यांगांना वाहन पार्क करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. दिव्यांगांसाठी बांधलेले स्वतंत्र स्वच्छतागृह सर्वांसाठी खुले करण्यात आले असून, तेथे अस्वच्छतेचे सामाज्य पसरले आहे. तुटलेले दरवाजे, नळ आणि पाईप यामुळे स्वच्छतागृह वापरण्यायोग्य राहिलेले नाही. दुर्गंधीमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

तसेच, दिव्यांगांसाठी स्वतंत्र केसपेपर खिडकी नसल्याने त्यांना सर्वसामान्य रांगेत उभे राहावे लागते. औषध वितरणासाठी असलेल्या खिडकीवरही ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांची एकत्रित रांग असल्याने दिव्यांगांना तेथे पोहोचणे कठीण जाते. जनरल ओपीडीमध्ये बैठकीची अपुरी व्यवस्था असल्याने दिव्यांगांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

एकूणच दिव्यांगांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या सुविधा केवळ कागदावरच असल्याचे चित्र असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. जर निधी आणि दुरुस्तीची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाणार असेल तर उपचारासाठी येणाऱ्या दिव्यांग रुग्णांनी न्याय कोणाकडे मागावा?, प्रशासनाने कागदी घोडे नाचविण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर सुधारणा करण्याची मागणी दिव्यांगांकडून केली जात आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी रुग्णालय परिसरात कायद्यानुसार अडथळामुक्त वातावरण तयार करण्यासाठी रॅम्प, स्वतंत्र पार्किंग आणि सुविधायुक्त स्वच्छतागृह उभारले असले तरी ते केवळ नावालाच आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झालेली नाही. दिव्यांगांच्या मुक्त संचारासाठी रुग्णालय परिसराचे ॲक्सेस ऑडिट करणे आवश्यक आहे.
हरिदास शिंदे, समुपदेशक तथा दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रातील कार्यकर्ते
दिव्यांगांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठीचा रॅम्प दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे सध्या ते बंद ठेवण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना कॅज्युअलटी विभागामार्फत ये-जा करण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वच्छतागृह दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे. कॅम्पमधील सिविल व इलेक्ट्रिकल संबंधित सर्व दुरुस्तीची कामे संबंधित विभागांकडूनच करण्यात येतात. दिव्यांग व्यक्तींना औषधे मिळण्यासाठी शेवटच्या काउंटरवर स्वतंत्र सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक औंध जिल्हा रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT