लोणावळा: एकवीरा मातेच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराला विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवरात्रीनिमित्त मंगळवार (दि. 23) भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी त्यांनी नैवेद्य आणि महावस्त्र देवीला अर्पण केला; तसेच मंदिराच्या पायथ्याशी आमदार निधीतून सभामंडप उभारणार असल्याचे सांगितले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, येथे वाहनतळाचा प्रश्न, खड्डेमय रस्ते आणि भाविकांच्या सुविधेशी निगडित अनेक कामे अद्याप प्रलंबित आहेत. पीएमआरडीए आणि एमएमआरडीएने काही प्रमाणात लक्ष घातले असले तरी अधिक समन्वय साधून ही कामे वेगाने पूर्ण होणे गरजेचे आहे. दिवाळीनंतर विधानभवनात विशेष बैठक घेऊन संबंधित विभागांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात येणार असून, अनेक वर्षे थांबलेली कामे गतिमान करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Latest Pimpari chinchwad News)
शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार, एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्याशी भाविकांसाठी सभामंडप उभारण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या आमदार निधीतून 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली. पीडब्ल्यूडीकडून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ मिळताच या कामाला तातडीने सुरुवात होईल.
या प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत भगिनी जेहलम जोशी, शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख कांता पांढरे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, मावळ तालुकाप्रमुख राम सावंत, युवासेनेचे विशाल हुलावळे, युवा सेना जिल्हा उपप्रमुख दत्ता केदारी, ग्रामस्थ मिलिंद बोत्रे, मधुकर पडवळ, पोलिस पाटील अनिल पडवळ, संतोष कुटे, सुरेश गायकवाड, चंद्रकांत भोते, नवनाथ हारपुडे तसेच ग्रामपंचायत सदस्य राजू देवकर, सचिन हुलावळे व सागर हुलावळे उपस्थित होते.