

पिंपरी: घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 25 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सांगवी पोलिसांनी ही कामगिरी केली. जयंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिसांचे तपास पथक घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. दरम्यान, त्यांना सीसीटीव्हीमध्ये आरोपी संशयितरित्या दिसून आला. त्यानुसार, सापळा रचून आरोपीला पकडल्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. (Latest Pimpari chinchwad News)
त्यानुसार, आरोपीने सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 4, भोसरी, दापोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक ठिकाणी घरफोडी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, उपायुक्त शिवाजी पवार, उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
आरोपीवर 103 गुन्हे
जयंत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर तब्बल 44 गुन्हे दाखल आहेत. तसेच, आणखी 53 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे. सांगवी पोलिसांनी 6 गुन्हे उघडकीस आणल्यामुळे आरोपीवरील गुन्ह्यांची संख्या 103 वर गेली आहे.