बजरंग मासाळ
पिंपरी: वयाच्या ८४ व्या वर्षीही रोज सुमारे १०० किलोमीटर सायकल चालवत शहराचा कानाकोपरा पिंजून काढणारे अशोक बेलापूरकर (आप्पा) हे पिंपरी-चिंचवडमधील वेगळेच व्यक्तिमत्त्व. ‘आप्पाचा विषय लय हार्डयं’ हे गाणे वाजले की, डोळ्यांसमोर येतो तो सायकलवरून वाऱ्याच्या वेगाने फिरणारा आप्पांचा चेहरा. आळंदी ते भोसरी आणि पुढे तळेगाव, चाकण, हिंजवडी, पिंपरी असा त्यांचा रोजचा प्रवास. शहरात काय नवीन घडतेय, कोणते नवे प्रयोग सुरू आहेत, याची माहिती घेत ते आजही सायकलवरूनच भेटीगाठी करतात. आधुनिक गिअरची सायकल नाही, तर साधी सायकल हीच त्यांचा आजपर्यंतच्या जीवनाची साथीदार आहे.
१९५२ पासून सायकलशी नाते
आप्पांचा सायकल प्रवास तब्बल सात दशकांहून अधिक जुना आहे. लहानपणापासून सायकलची असलेली आवड व चालवण्याची धडपड पाहून त्यांच्या वडिलांनी शेळी आणि दोन बोकड विकून ४५ रुपयांना सायकल घेऊन दिली. ‘सायकलचा चांगला उपयोग कर,’ एवढाच संदेश वडिलांनी दिला आणि तोच आप्पांनी आयुष्यभर जपला.
४७ वर्षांची सायकल अन् आप्पा दोघेही जोषात
वर्षानुवर्षांच्या प्रवासात अनेक सायकली आल्या-गेल्या; मात्र सुमारे ४७ वर्षे जुनी सायकलही आप्पांच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहे. लाखो किलोमीटरचा प्रवास, असंख्य रस्ते आणि हजारो आठवणी या सायकलने पाहिल्या आहेत. सायकलवरून आळंदी-पंढरपूर वारीसह विविध भागांत त्यांनी प्रवास केला आहे.
सायकलचे शहर’ ही ओळख कायम राहावी!“एकेकाळी आपले शहर ‘सायकलचे शहर’ म्हणून ओळखले जायचे. शहराची ही ओळख काळाच्या ओघात कमी होऊ नये, तर नव्या पिढीने पुन्हा सायकलकडे वळावे, यासाठी माझी धडपड सुरू आहे. सायकल ही केवळ प्रवासाचे साधन नसून आरोग्य, पर्यावरण आणि आर्थिक बचतीचा मार्ग आहे. त्यामुळे तरुणांनी सायकलचा अधिकाधिक वापर करावा, हाच माझा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगीतले
पोहणे, योग अन् व्यायामही नित्याचा
सायकलिंगसोबतच पोहण्याचीही आप्पांना आवड आहे. कॅनॉल, विहीर आणि स्विमिंग पूलमध्ये आजही ते पोहण्यासाठी जातात. जोर, जोरचक्र, योगासने आणि प्राणायाम असा त्यांचा नियमित व्यायाम सुरू असतो. आरोग्य टिकविण्यासाठी शरीराला सतत हालचालीत ठेवण्याचा त्यांचा आग्रह आहे.
साधा आहार, शिस्तबद्ध दिनचर्या आप्पांच्या तंदुरुस्तीचे गमक!
मोड आलेली कडधान्ये, दूध, पालेभाज्या आणि सकस शाकाहारी आहार हा आप्पांच्या रोजच्या जेवणाचा मुख्य भाग. आहारासोबतच वेळेचे काटेकोर नियोजन हे त्यांच्या दिनचर्येचे वैशिष्ट्य आहे. सकाळी ९ वाजता जेवण, त्यानंतर दिवसभराच्या कामानुसार आहाराचे नियोजन आणि सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी रात्रीचे जेवण असा त्यांचा शिस्तबद्ध दिनक्रम आहे. रात्री १० वाजता दिवे बंद करून झोपण्याची सवय त्यांनी आजही कायम ठेवली आहे.
तरुणांना एकच संदेश…
आप्पांच्या मते, आजच्या पिढीने आरोग्यासाठी सायकलिंगकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पेट्रोलचा खर्च कमी करण्यासोबतच शरीराचीही काळजी सायकलमुळे घेतली जाऊ शकते, असा त्यांचा अनुभव आहे.
९३ शर्यतींचा अनुभव
आप्पांनी आतापर्यंत तब्बल ९३ रेसिंग शर्यतींमध्ये सहभाग घेतला आहे. विविध स्पर्धांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, अनेक संस्था व फाउंडेशनकडून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पुणे ग्रँड टूरमुळे आप्पा पुन्हा चर्चेत आले; मात्र त्यांची ओळख त्याआधीपासूनच ‘सायकलपटू आप्पा’ अशी होती.
मंत्रालयापर्यंत सायकलवर!
पुण्याहून थेट मंत्रालयापर्यंत सायकलवरून प्रवास करूनही आप्पांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्या सायकलप्रेमाची दखल घेत विविध मान्यवरांनी त्यांना भेटीसाठी निमंत्रित केले. पिंपरी-चिंचवडच्या महापौरांकडूनही त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शहराचे ‘कार्ड’ म्हणून संबोधण्यात आले आहे.
पोट आणि पेट्रोलवर उत्तम उपाय म्हणजे सायकल. निरोगी राहायचं असेल तर सायकल चालवा. पल्ला जवळचा असो की लांबचा; सायकल घेतली की निघालो! सायकल हेच माझं जीवन आहे आणि सायकलमुळेच माझी ओळख निर्माण झाली. माझ्याकडून आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, एवढीच इच्छा आहे.अशोक बेलापूरकर (आप्पा), सायकलपटू