Sant Tukaram Maharaj Temple Pudhari
पिंपरी चिंचवड

Dehu Ashadhi Ekadashi: देहूनगरी विठ्ठलनामात दंग; आषाढी एकादशीला तुकोबारायांच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर

पहाटेपासून मंदिरात लांबच लांब रांगा; टाळ-मृदंगाच्या गजरात देहू भक्तिरसात न्हाऊन निघाले, इंद्रायणीच्या तीरावर भाविकांची मांदियाळी

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: देवशयनी आषाढी एकादशी (चातुर्मासारंभ) निमित्त श्रीक्षेत्र देहूगाव येथे विठ्ठल-रखुमाई आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी वारकरी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखंड हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात देहूनगरी भक्तिमय वातावरणाने भारून गेली होती. या वेळी तुकोबारायांच्या अभंगांचा जयघोष करत भाविकांनी दर्शन घेतले.

जन्मा येऊनि का रे निदसुरा। जाय भेटी वरा रखुमाईच्या।।१।।

पाप ताप दैन्य जाईल सकळ। पावसी अढळ उत्तम ते।।२।।

संत महंत हरिदास दाटणी। फिटती पारणी इंद्रियाची।।३।।

तुका म्हणे तेथे नामाचा गजर। फुकाची अपार लुटी होई।।४।।

या अभंगातील संदेशाप्रमाणे पाप, ताप आणि दैन्य नष्ट होण्याच्या दृढ विश्वासाने हजारो भाविक देहूत दाखल झाले होते. विठ्ठल-रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी तुकोबारायांचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर देहू देवस्थान संस्थानच्या वतीने विठ्ठल-रखुमाई मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, शिळा मंदिर, भजनी मंडप, राममंदिर व महाद्वार येथे फुलांच्या आकर्षक सजावटीने परिसर सजला होता. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल”, “ज्ञानेश्वर माऊली”, “तुकाराम” या नामघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता.

या वेळी भाविकांनी तुकोबारायांचा हा अभंग स्मरणात ठेवत भावभावनांची अभिव्यक्ती केली...

जया दोषा परिहार। नाही नाही धुंडिता शास्त्र।।१।।

ते हरती अपार। पंढरपुरा देखिलिया।।२।।

धन्य धन्य भीमातीर।चंद्रभागा सरोवर ।।३।।

पद्यतीर्थी विठ्ठल वीर। क्रीडास्थळ वेणूनाद।।४।।

सकळ तीर्थांचे माहेर। भुवैकुंठ निर्विकार।।५।।

इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळाले. त्रिवेणी संगम हा साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घडवणारा मानला जात असल्याने भाविकांनी येथे स्नान करून पुण्यलाभ घेतला. तुकाराम महाराजांच्या भक्तिमय संदेशाचा प्रत्यय देणारा आणखी एक अभंगही भाविकांच्या ओठांवर झळकत होता..

घेईन मी जन्म याजसाठी देवा। तुझी चरणसेवा साधावया।।१।।...

होई नामकीर्तन संतांचे पूजन। घालू लोटांगण महाद्वारी।।..

आषाढी एकादशीच्या निमित्ताने देहूनगरीत उसळलेल्या या भक्तिसागराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र अनुभवायला मिळाले.

इंद्रायणीच्या साक्षीने पंढरीला भाविकांचा निरोप

पंढरपूरला प्रत्यक्ष जाऊ न शकणारे अनेक भाविक देहूत येऊन इंद्रायणीच्या पवित्र जलातून विठुरायाला नमस्कार अर्पण करतात. इंद्रायणी नदी पुढे भीमा आणि त्यानंतर चंद्रभागा नदीत विलीन होत असल्याने हा आध्यात्मिक दुवा मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT