पिंपरी : हिंजवडी, म्हातोबा टेकडीजवळील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून मिटींगला जाणाऱ्या सेविका आणि मदतनीस यांचे निलंबन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवनाथ जांभुळकर यांनी पर्यवेक्षिका संध्या विश्वासराव यांना फोन करून हिंजवडी ग्रामपंचायतअंतर्गत सहा अंगणवाडी केंद्राच्या सेविका व मदतनीस यांना ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठकीसाठी उपस्थित रहाण्याच्या सूचना देण्यास सांगितले होते.
अंगणवाडी क्रमांक तीनमधील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे या अंगणवाडीमध्ये मुलांना कोंडून मिटींगसाठी निघून गेल्या. त्यामुळे मुलांनी घाबरून रडारड केली. पालकांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणाबाबत सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. अंगणवाडी केंद्रात बालकांना दरवाज्यास कुलूप लावून बैठकीस उपस्थित राहणे ही बाब बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असल्याने सेविका आणि मदतनीस यांचे निलंबन करण्यात आले आहे.
या प्रकरणातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे निलंबन करण्यात आले आहे. पुढील कार्यवाहीचा प्रस्ताव सोमवारी देण्यात येईल. सध्या क्रमांक 3 अंगणवाडीची जबाबदारी दुसऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडे देण्यात आला आहे.धनराज गिराम, (बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, मुळशी)