पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीत आरोपींकडून काही चॅटिंगचा उल्लेख करण्यात आला असून, या माध्यमातून घटनांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या दाव्यांची मांडणी करण्यात आली. दरम्यान, वैष्णवीचा मामा व काकांनी माध्यमांशी बोलताना या आरोपांवर प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
या सुनावणीत पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांची पोलिस कोठडी एक दिवस वाढवण्यात आली आहे. तसेच, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
हगवणे मृत्यूप्रकरणाशी संबंधित काही चॅटिंगचा उल्लेख न्यायालयात करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. यासंदर्भात वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी प्रतिक्रिया देताना, अशा प्रकारचे कोणतेही चॅटिंग झाले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, मृत्यू झाल्यानंतर दुसर्या दिवशी त्यांनी वैष्णवीच्या मुलाची विचारपूस केली होती, आणि संबंधित व्यक्तींनी स्वतः फोन करून बाळ रडत असल्याची माहिती दिली होती, असे ते म्हणाले. त्यांनी या प्रकरणातील पैशासंबंधी बाबींचाही उल्लेख केला.
तसेच, वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनीही या संदर्भातील माहिती फेटाळली असून, कोर्टात दिशाभूल करणारे मुद्दे मांडले जात आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात आता काही नवे सापडत नसल्याने चुकीची माहिती पसरवली जात आहे, असेही ते म्हणाले.
याचवेळी, न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान आरोपींच्या वतीने मांडण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये वैयक्तिक संवाद, मेसेज आणि इतर व्यवहारांची माहिती दिली गेली. यावर वैष्णवीच्या कुटुंबीयांनी आपले उत्तर दिले असून, संबंधित घटनांची सत्यता तपासण्यासाठी अधिकृत तपास अहवाल व पुराव्यांची प्रतीक्षा असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्रकरणाची सुनावणी सुरू असताना विविध बाजूंकडून समोर येणार्या माहितीमुळे प्रकरणात नवे पदर उलगडत असून, पोलिस व न्यायालयीन तपासाच्या निष्कर्षावर अंतिम भूमिका ठरणार आहे. बावधन पोलिस तपास करत आहेत.