

पिंपरी : राजकीय नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले असताना, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दीड वर्षांत 30 विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याच कालावधीत पावणेतीनशे विवाहित महिलांनी सासरच्या मंडळींवर कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि मानसिक त्रास देण्याचे आरोप करत पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. जानेवारी 2024 ते मे 2025 या कालावधीत या घटना घडल्या असून, त्यातील बहुतांश प्रकरणे समाजाच्या मुख्य प्रवाहातून दुर्लक्षित राहिली आहेत.
या आत्महत्यांमागे मानसिक छळ, हुंड्याची मागणी, पतीचे व्यसनाधीन वर्तन, कौटुंबिक कलह, संशयाचे वातावरण, आर्थिक अडचणी, सासरच्या मंडळींकडून अपमानास्पद वागणूक ही मुख्य कारणे आहेत. काही प्रकरणांमध्ये विवाहित महिलांवर मातृत्वाचा दबाव, मूल होत नसल्यामुळे होणारा ताण, सतत अपमानित केले जाणे; तसेच पतीच्या परस्त्री संबंधांचा त्रासही आत्महत्येस कारणीभूत ठरला आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्येचे प्रकरण चर्चेत आले, कारण ती एका राजकीय नेत्याची सून होती. त्यामुळे या प्रकरणाला प्रसारमाध्यमांत, राजकीय क्षेत्रात आणि समाजात मोठी दखल मिळाली. पोलिस कोठडी, पत्रकार परिषद, आंदोलने, राजकीय वक्तव्ये यामुळे प्रकरण वेगवेगळ्या टप्प्यांवर चर्चेचा विषय बनले; मात्र अशाच स्वरूपाची अन्य अनेक प्रकरणे दुर्लक्षित असल्याने समाजातून खंत व्यक्त होत आहे.
बहुतांश प्रकरणांमध्ये महिलांच्या मृत्यूनंतर संबंधित सासरच्या लोकांविरुद्ध पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. काही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीतही ठेवण्यात आले. मात्र काही दिवसांतच हे आरोपी जामिनावर बाहेर आले. त्यानंतर संबंधित महिलांचे कुटुंबीय वर्षानुवर्षे न्यायासाठी कोर्ट-कचेर्यांचे उंबरे झिजवत आहेत. अनेक वेळा आर्थिक मर्यादा, सामाजिक दबाव, आणि कायदेशीर प्रक्रियेची गुंतागुंत या अडचणी न्यायाच्या मार्गात अडसर ठरत आहेत.
विवाहित महिलांनी अशा प्रसंगी तत्काळ मानसिक आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा; तसेच सरकारी महिला तक्रार निवारण केंद्र, महिला आयोग आणि स्वयंसेवी संस्थांचा आधार घ्यावा. पोलिसांकडे वेळेत तक्रार दाखल करणे, साक्षीदार गोळा करणे आणि कायदेशीर प्रक्रिया राबविणे यासाठी प्रशिक्षित व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. कौटुंबिक वादांमध्ये मध्यस्थी आणि समुपदेशन केंद्रांची मदत घेणे हेही महत्त्वाचे ठरू शकते.