Alandi Chain Snatching Pudhari
पिंपरी चिंचवड

Alandi Chain Snatching Case: आळंदीतील सोनसाखळी चोरीप्रकरणी तिघांना अटक; १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

भररस्त्यात नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्ह्यात वापरलेली चारचाकीही जप्त

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: आळंदी परिसरात भररस्त्यात एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने अटक केली आहे.

संशयितांकडून चोरीस गेलेली सुमारे चार लाख ९५ हजार रुपयांची सोनसाखळी आणि आठ लाख रुपयांची चारचाकी असा एकूण १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वैष्णव शरद कदम (वय २०), सचिन जालिंदर कदम (वय ४२) आणि विजय ज्ञानेश्वर कदम (३३, सर्व रा. निरगुडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी पोलिस ठाण्याच्याहद्दीत ९ जून रोजी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी एका नागरिकाला दुखापत करून गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली होती. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त रोहिदास पवार आणि सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी उपनिरीक्षक महेश खांडे, पोलिस अंमलदार गणेश हिंगे, नितीन लोखंडे, अमर कदम, चंद्रकांत गडदे, सोमनाथ मोरे, नितीन उमरजकर, हर्षद कदम, मोहसिन आत्तार, विनोद वीर, गणेश सावंत, औंदुबर रौंगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

संशयितांना दिले आळंदी पोलिसांच्या ताब्यात

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून सुरू होता. दरम्यान, १३ जून रोजी पोलिस अंमलदार अमर कदम यांना संशयितांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर श्रेणी पोलिस उपनिरीक्षक महेश खांडे, पोलिस अंमलदार नितीन लोखंडे, अमर कदम, गणेश हिंगे आणि चंद्रकांत गडदे यांच्या पथकाने सापळा रचून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीस गेलेली ३३.८१० ग्रॅम वजनाची सोनसाखळी तसेच, गुन्ह्यात वापरलेली आठ लाख रुपये किमतीची चारचाकी संशयितांकडून जप्त केली. पुढील तपासासाठी संशयितांना आळंदी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT