आकुर्डी: मेट्रोचे खोदकाम सुरू असताना जलवाहिनी फुटल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत होणारा आकुर्डीतील पाणीपुरवठा बुधवारी (दि.१८) दिवसभरासाठी विस्कळीत झाल्याने नागरिकांना व महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
पुणे महामेट्रोचे काम सुरू असताना आज निगडीत टिळक चौकातील महापालिकेची पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे सकाळपासून आकुर्डी परिसरातील पंचतारानगर, पांढरकरवस्ती, शिवांजली अपार्टमेंट, शुभश्री अपार्टमेंट, महापालिका दवाखाना परिसर, विठ्ठल मंदिर परिसर अशा अनेक भागांमध्ये सकाळी होणारा पाणीपुरवठा सायंकाळपर्यंत होऊ शकला नाही.
त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यातच पाणीपुरवठा विभागामार्फत काही तासांत पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत होण्याचे आश्वासन दिल्याने महिलांमध्ये शांततेचे वातावरण होते; परंतु सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा न झाल्याने महिलांनी दिवसभराचा राग पाणीपुरवठा विभागावरती काढला यातच सायंकाळी पाणी येण्याचे कालावधीमध्ये महावितरणकडून वीजपुरवठा खंडित झाल्याने महिलांनी वीजपुरवठा कार्यालयात फोनाफोनी करून तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
आज दिवसभरामध्ये मेट्रोच्या खोदकामामुळे पाणीपुरवठा विभागाची जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी बराच वेळ खर्ची पडल्यामुळे सायंकाळपर्यंत पाणीपुरवठ्याची वाट पाहणारे महिलांचा पारा वर चढल्यामुळे स्थानिक प्रतिनिधींकडे याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या. या वेळी स्थानिक प्रतिनिधींकडून सायंकाळी उशिरापर्यंत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सुतोवाच करण्यात आले.
टंचाईच्या काळात हजारो लिटर पाणी वाया
पाणीटंचाईच्या कालखंडामध्ये खोदकामामुळे निगडीतील जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. तसेच आकुर्डी परिसरातील बहुतांश भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महिलांचा दिनक्रम विस्कळीत झाला ममीन.