Akurdi Railway Station Redevelopment Pudhari
पिंपरी चिंचवड

Akurdi Railway Station Redevelopment: अमृत भारत योजनेतून आकुर्डी रेल्वे स्थानकाचा कायापालट; आधुनिक सुविधांनी सज्ज नवे रूप

प्रवाशांसाठी लिफ्ट, सरकते जिने, एलईडी स्क्रीन आणि पार्किंग सुविधा; पुणे उपनगरीय रेल्वे प्रवास होणार अधिक सुलभ

पुढारी वृत्तसेवा

आकुर्डी: पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात झपाट्याने वाढ होत आहे. देशाची जीवनवाहिनी म्हणून संबोधली जाणारी रेल्वे, उपनगरीय रेल्वे वाहतूक सर्वत्र सुसज्ज होताना दिसत आहे. लोणावळा ते पुणे उपनगरीय वाहतुकीसह महत्त्वपूर्ण व मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक असलेल्या आकुर्डी रेल्वे स्थानकाचा केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेमार्फत आधुनिक पद्धतीने कायापालट होत असून, या स्थानकाने कात टाकली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील व राज्यातील रेल्वे प्रवाशांना अधिक सोयीसुविधा देत प्रवास सुखकर व आल्हाददायक व्हावा, यासाठी आकुर्डी रेल्वे स्थानक सुसज्ज होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या आकुर्डी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण सुरू असून, बरेच काम प्रगतिपथावर आहे. पूर्वीचे आकुर्डी रेल्वे स्थानक आणि आता अत्याधुनिक सुविधांनी विकासलेले स्थानक प्रवाशांना सुखकर होत आहे. स्थानकाची बरीचशी विकासाची कामे प्रगतिपथावर असून, काही कालावधीतच सुसज्ज देखणे आणि पूर्णपणे कायापालट झालेले रेल्वे स्थानक निश्चितच रेल्वे प्रवाशांना सेवेने आकर्षित करणारे ठरेल.

आकर्षक मुख्य प्रवेशद्वाराजवळच दोन्ही बाजूने उपप्रवेशद्वार, आकर्षक सरकते जीने, ज्येष्ठ, दिव्यांग महिलांसाठी रॅम्पच्या साह्याने प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. या प्रवेशद्वारामुळे प्रवाशांच्या गर्दीवर अंकुश ठेवण्यात निश्चित मदत होईल. उपप्रवेशद्वाराजवळच प्रवाशांच्या वाहनांची सुसज्ज, सुरक्षित अशी पार्किंग व्यवस्था ऊन -वारा- पाऊस यांपासून रक्षण करण्यासाठी भव्य आकर्षक आच्छादने असणारी वाहनांसाठी ”पे अँड पार्क”ची सुलभ व्यवस्था, प्रवाशांच्या वेळेची बेरीज साधण्यास सुकर होईल. या मुख्य व उपप्रवेशद्वाराजवळ आत-बाहेर सुसज्ज अशा भव्य आकर्षक सूचक वेळापत्रक दर्शविणारी इलेक्ट्रॉनिक एलईडी स्क्रीन असल्यामुळे प्रवासाची वेळ आणि दिशा यांच्यात सांगड घालता येणार आहे.

प्रवाशांसाठी अशी केली सोयीसुविधा

स्थानकाला दोन फलाट असून, दोन्ही फलाटावरती सुसज्ज आधुनिक लिफ्ट सुविधा, एक्सलेटर सरकते जिने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रवाशांसाठी आकर्षक ॲल्युमिनियम आरामदायी खुर्च्यांची प्रशस्त बैठक व्यवस्था, ठिकठिकाणी बसवलेले नवीन पंखे, दुतर्फा बसविलेल्या वेळापत्रक दाखवणारे एलईडी दिशादर्शक फलक, वातानुकूलित प्रशस्त प्रतीक्षागृह, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शौचालय, स्वच्छतागृहांची सुविधा, दिव्यांग व ज्येष्ठांसाठी रॅम सुविधा, सरकते जीने व दादराची व्यवस्था, आकर्षक रंगरंगोटी केलेले स्वच्छ सुंदर रेल्वे स्थानक प्रवाशांच्या स्वागतासाठी काही कालावधीतच पूर्णत्वाने सज्ज होत आहे.

सध्या पुणे, कर्जत ते पनवेल दरम्यानच्या स्थानकांचा अंतिम पाहणी दौरा सुरू असून, केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेअंतर्गत आकुर्डी रेल्वे स्थानकाचे काम प्रगतिपथावर आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि देहूरोड व तळेगाव या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा प्राप्त करून आकर्षक आणि सुशोभीकरण केलेले स्थानक बनविण्यात येणार आहे. तसेच कर्जत ते पनवेल 29.6 किलोमीटरच्या ट्रॅकचे काम प्रगतिपथावर असून, भविष्यात उपनगरीय वाहतूक सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे पुणे ते नवी मुंबई असा प्रवास करणे सोपे होईल, त्याचबरोबर पुणे- कल्याण- मुंबई धावणाऱ्या गाड्यांचा प्रवासी त्रास व ताण कमी होण्यास मदत होईल.
श्रीरंग बारणे, खासदार.
आकुर्डी रेल्वे स्थानकाचे काम काही दिवसांतच पूर्ण होऊन हे अत्याधुनिक सुसज्ज स्थानक प्रवासी लोकसेवेत दाखल होणार आहे. चिंचवड, पिंपरी, देहूरोड, तळेगाव या स्थानकावर इतर प्रवासी वाहतूक गाड्यांना भविष्यात थांबा देण्यात येईल. तसेच लोणावळा ते पुणे उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवेच्या फेऱ्याही वाढविण्यात येणार आहेत.
बशीर सुतार, केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT