Akurdi Railway Station Stunt Pudhari
पिंपरी चिंचवड

Akurdi Railway Station: 'मेरा मोबाईल, मेरा रिचार्ज, मेरी रील... मेरी मर्जी!'; आकुर्डी रेल्वे स्थानकात मद्यधुंद व्यक्तीचा फिल्मी तमाशा

‘मेरी मर्जी’ म्हणत रेल्वे रुळांवर फिरत होता; रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: आकुर्डी रेल्वे स्थानकात लोकलची प्रतीक्षा करणारे प्रवासी, आणि त्यात अचानक सुरू झालेला फिल्मी तमाशा! आकुर्डी रेल्वे स्थानकात एका मद्यधुंद व्यक्तीने थेट रेल्वे रुळांवर उतरून हिंदी चित्रपटातील संवादबाजी सुरू केली. 'तुझे देखा तो ये जाना सनम...' पासून 'मेरा मोबाईल, मेरा रिचार्ज, मेरी रील... मेरी मर्जी!' अशा फिल्मी थाटातील संवादांनी त्याने स्वतःचेच मनोरंजन सुरू केले. मात्र, त्याची ही हिरोगिरी प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरत होती. रेल्वे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य धोका टळला.

‘मेरी मर्जी’चा अतिरेक!

मोबाईल, रिचार्ज आणि रीलच्या नावाने सुरू असलेली त्यांची संवादफेक काहींसाठी कुतूहलाचा विषय ठरली. मात्र, स्वतःची मर्जी चालवण्याच्या नादात रेल्वे सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात होते. रुळांवरून वारंवार ये-जा करण्याचा प्रकार सुरू असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

प्रवाशांना मनोरंजन की धोक्याची चाहूल?

सुरुवातीला काही प्रवासी या प्रकाराकडे कुतूहलाने पाहत होते. मात्र, संबंधित व्यक्ती रेल्वे रुळांवरच वावरत असल्याने त्याच्या जवळ एखादी दुर्घटना घडेल की काय, अशी भीती निर्माण झाली. रेल्वे मार्गावर अचानक गाडी आल्यास काही क्षणांत परिस्थिती गंभीर होऊ शकते, याची जाणीव प्रवाशांना होती.

वेळीच हस्तक्षेप; अन्यथा अनर्थ!

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी आणि नागरिकांनी संबंधित व्यक्तीला रुळांवरून बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी हटविण्यात आले. रेल्वे रुळांवर अनधिकृतपणे उतरणे हा केवळ नियमभंग नसून स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण करणारा प्रकार आहे. त्यामुळे अशा घटनांकडे केवळ गंमत म्हणून पाहण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे.

लोहमार्गावरच फिल्मी स्टेज!

रेल्वे स्थानक म्हणजे प्रवाशांच्या येण्या-जाण्याचे ठिकाण; मात्र या महाशयांनी रुळांवरच आपला अभिनय सुरू केला. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांसमोर हातवारे करत संवादबाजी सुरू होती. चित्रपटातील नायकाप्रमाणे वावरण्याच्या नादात रेल्वे रुळांवरील धोक्याचे भानच हरपल्याचे चित्र दिसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT