Akurdi Nigdi School Traffic Pudhari
पिंपरी चिंचवड

Akurdi Nigdi School Traffic: आकुर्डी-निगडीतील शाळांबाहेर वाहतूक कोंडीचा विळखा; विद्यार्थी-पालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडण्याची वेळ

शाळा भरते-सुटतेवेळी वाहनांची प्रचंड गर्दी; वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून कोंडी सोडविण्याची पालकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

आकुर्डी: निगडी, प्राधिकरण, आकुर्डी या परिसरामध्ये अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये असून, बहुतांशी शाळा या लोकवस्तीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. साधारणतः शाळा भरतेवेळी व सुटतेवेळी शाळा, महाविद्यालयांसमोर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन पालक-विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. तसेच वाहतूक कोंडीमुळे पालकांसह विद्यार्थी व वाहनचालक त्रस्त आहेत. येथील कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरामध्ये विकासकामांचा धमाका सुरू असून, अनेक रस्ते विकासकामामुळे अरुंद बनले आहेत. त्यात विविध ठिकाणी होणारे अतिक्रमण यामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यातच आकुर्डी, निगडी परिसरात सातत्याने मुख्य व अंतर्गत रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सीएमएस विद्यालय, निगडी, म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी, रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी विद्यालय निगडी, कॅम्प एज्युकेशन सोसायटी, सरस्वती विद्यालय, सिटी प्राईड, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, या शाळा मध्यवर्ती लोकवस्तीत असून, शाळा भरते व सुटतेवेळी वेळी खासगी चारचाकी, दुचाकी, शालेय परिवहन वाहतूक व्यवस्थेमुळे हमखास वाहतूक कोंडी होते.

मात्र, यासाठी मध्यवर्ती लोकवस्तीत असलेल्या शाळा महाविद्यालयाजवळ नाहीच नाही परंतु चौकातही वाहतूक नियंत्रण अधिकारी नसतात, त्यामुळे ही वाहतूक कोंडी नियमितपणे होत आहे. याचा त्रास पालक विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. शाळा व्यवस्थापन व वाहतूक नियंत्रण विभाग यांनी यावर योग्य तो पर्याय निवडून नागरिक, पालक व विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करण्याची मागणी समस्त पालक व नागरिकांकडून होत आहे.

वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्याची नियुक्ती करा

निगडी प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौकादरम्यान अनेक शाळा, महाविद्यालये असून, दुपारी व शाळा सुटते वेळी शालेय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. यावर निर्बंध घालण्यासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. शालेय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांमुळे दररोज वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शालेय व्यवस्थापन व वाहतूक नियंत्रण अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

सध्या शहरातील बहुतांश रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. एकही रस्ता खड्ड्यांविना दिसून येत नाही. यामुळे वाहतूक मंदावत असून त्यात शाळा परिसरात शाळा भरतेवेळी व सुटतेवेळी वाहनांची संख्या वाढत असल्याने शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. यामुळे या मार्गावरून कामाच्या ठिकाण आ ॅफिस तसेच कंपनीमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यांना निश्चित वेळेत पोहोचण्यास अडथळा येत आहे. यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे.
मनीषा महाजन, स्थानिक
शाळा सुटताना व भरताना शालेय परिसरात व रस्त्यावर वाहतूक नियंत्रण अधिकारी उपस्थित असणे विद्यार्थी संरक्षणाच्या दृष्टीने हितावह आहे. शाळा व्यवस्थापन व वाहतूक नियंत्रण अधिकारी यांच्या समन्वयातून वाहतूक कोंडीचा नित्याचा बनलेला प्रश्न सोडवावा व कायमस्वरूपी पालक व विद्यार्थी यांची त्रासातून मुक्तता करावी.
स्वाती पाटील, शिक्षिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT