Fire Pudhari
पिंपरी चिंचवड

Akurdi Transformer Fire: आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ विद्युत रोहित्राला आग; वाहतूक कोंडी, नागरिकांचा संताप

अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात; महावितरणच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

आकुर्डी: आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ रस्त्यालगत असणाऱ्या विद्युत रोहित्राने रविवारी रात्री 8.45 वाजता अचानक पेट घेतला. रस्त्यालगत विद्युत रोहित्र पेटल्याने परिसरात खळबळ उडाली. जवळजवळ अर्ध्या तासाने अग्निशमन दलाची गाडी येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत विभागाने विद्युत प्रवाह बंद न केल्यामुळे अग्निशमन दलासमोर काही कालावधी पुरता पेचप्रसंग निर्माण झाला. अखेर विद्युतप्रवाह बंद झाल्यानंतर अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यात यश प्राप्त आले.

काही कालावधीतच आग पूर्णपणे विझली गेली. यामध्ये कुठलीही जीवितहानी न झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विद्युत रोहितच्या बाजूला खाऊ गल्ली व अनेक छोटे मोठे शॉप्स, दुकाने असल्याने या भागात सातत्याने गर्दी आढळते.

परंतु दुर्दैवाने कोणत्याही दुकानदाराकडे अग्निशमन नळकांडी नसल्याने आग लहान स्वरुपात असताना प्रयत्न करता आला नाही. अखेर बारामती डबेवाला या शॉपचे मालक कुणाल राऊत यांनी आपल्या गाडीतील छोटेसे अग्निशमन नळकांडे काढत आग विझजवण्याचा प्रयत्न केला. काही अंशी आग शांत होण्यास मदत झाली. या प्रभागाचे नगरसेवक नीलेश तरस यांनी अग्निशमन दलाला संपर्क करून या संदर्भाची माहिती दिली. काही कालावधीतच अग्निशमन गाडी घटनास्थळी हजर झाली. त्यांनी काही मिनिटांत आग विझवली.

रस्त्यावर वाहनांच्या रांगा

विद्युत रोहित्र पेटत असताना काही कालावधीपुरती या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अर्ध्या तासाच्यावर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली. याचे चित्रकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये याचे चित्रकरण करून सोशल मीडियावर टाकले.

महावितरणाची दिरंगाई

रात्री उशिरापर्यंत विद्युत प्रवाह बंद असल्यामुळे नागरिकांना असह्य उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. मात्र विद्युत प्रवाह बंद झाल्यानंतरही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT