Akurdi Railway Station Redevelopment Pudhari
पिंपरी चिंचवड

Akurdi Chinchwad Railway Station: आकुर्डी, चिंचवड रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाला संथ गती; अडीच वर्षांनंतरही कामे अपूर्ण

लिफ्ट, सरकते जिने, प्रतीक्षागृहे प्रवाशांच्या प्रतीक्षेत; स्वच्छतागृहांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह, दोन महिन्यांत कामे पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत पुणे विभागातील आकुर्डी, तळेगाव रेल्वे स्थानकांवर पुनर्विकासाची कामे सुरु आहेत. या कामाला अडीच वर्षे झाले, तरी अजूनही ही अपूर्णावस्थेत आहेत. तसेच झालेल्या काही कामांबाबतच्या दर्जावरही प्रवशांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गंत आकुर्डी व तळेगाव दाभाडे या दोन्ही स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे सुरु आहेत. अनेक कामे पूर्णत्वाच्या उंबरठयावर आहेत. यामध्ये पादचारी पूल, लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांची कामे सुरु आहेत. पुणे आणि लोणावळयाला जोडणारे महत्वाचे स्थानक म्हणून चिंचवड आकुर्डी आणि तळेगाव रेल्वेस्थानकांची ओळख आहे. या स्थाकावरुन दररोज ४२ लोकल ये-जा करतात. प्रशस्त प्रतीक्षागृहे, सुधारित फलाट यासाठी चिंचवडसह देशातील ५५४ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइनद्वारे केला होता.

पहिल्या टप्यात पुणे विभागातील आकुर्डी, चिंचवड आणि तळेगावसह १६ स्थानकांचा सामवेश होता. चिंचवड रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासावर २० कोटी लाख रुपये आणि आकुर्डी रेल्वे स्थानकावर ३३ कोटी ८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र रेल्वेस्थानकांचे कामे अत्यत संथ गतीने सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रवाशांना हायटेक सुविधा

अमृत भारत योजने अंतर्गत पुणे विभागातील २० स्टेशन सुशोभीकरणाची कामे केली जात आहेत. यामध्ये आकुर्डी, आणि चिंचवड स्टेशनचा समावेश आहे. यामध्ये स्थानकांच्या दर्शनी भागापासून फलाटांवरील सुविधापर्यंत विविध सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वार, प्रवाशांना बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, दिव्यागंजनांसाठी सुविधा, प्रकाशयोजना आणि संरक्षक भिंतीचा कामांमध्ये समावेश आहे. स्थानिक कला आणि संस्कृतीचा समावेश करुन स्थाकांना वैशिष्टयपूर्ण रुप देण्यात येत आहे. यामध्ये दोन्ही स्टेशनवर नवीन प्रतीक्षागृहांचे काम अद्याप सुरुच आहेत. प्रवेश निर्गमनद्वाराचे कामे सुरु आहे. तर संरक्षक भिंतीचे काम पूर्णत्वाकडे आहे. फलाट क्रमांक १/२ च्या पृष्ठभागाचे काम ९० टक्के आणि छताचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. शिवाय रॅम्पसह पादचारी पुलाचे काम ७२ टक्के, तर पुलाच्या विस्ताराचे काम पूर्णत्वाकडे आहे.

इतर कामे पूर्णत्वाकडे : चिंचवड आणि आकुर्डी स्टेशनवरील लिफ्ट क्रमांक २,३ आणि ४ ची कामे अनुक्रमे ८५, ७५ आणि ५५ टक्के झाले आहेत. त्यात सरकता जिना क्रमांक २ चे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. पाणपोई, फलक स्वच्छतागृहांचे नूतनीकरण आणि प्रवेश परिसराच्या विकासाची कामेही ८० टक्केपेक्षा जास्त झाली आहेत. नवीन आरपीएफ ठाणे, विद्युत पॅनेल, कक्ष, तिकीट कार्यालयाचे नुतनीकरण आणि स्टेशन इमारतीशी संबंधित कामे जवळपास ९० टक्के झाली आहेत.

चिंचवड स्थानकांची सद्यस्थिती

  • सरकता जिना आणि फलाट क्रमांक दोन आणि तीनदरम्यान उद्वाहक बसविले आहेत. परंतु, ते अद्यापही प्रवाशांसाठी खुले केलेले नाहीत.

  • फलाट एक आणि तीनवर स्वच्छतागृहाची कामे पूर्ण; मात्र ती दर्जाहीन असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी

  • प्रामुख्याने स्वच्छतागृहांचे दरवाजे व्यवस्थित बंद होत नाहीत. बेसिन अत्यंत छोटे.

  • प्रतीक्षालय, पदपथ आणि इतर कामे अजूनही बाकी आहेत.

  • फलाट तीनच्या बाजूने जिना उभारणी सुरू, सरकत्या जिन्याचे काम सुरू

आकुर्डी रेल्वेस्थानक परिस्थिती

  • फलाट एक आणि दोनला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम अपूर्ण

  • रेल्वेस्थानकावर जलशुद्धीकरण यंत्र बसवले, परंतु ते अजूनही बंद अवस्थेत.

  • विद्युत उपकरणे बसविण्याची कामे अपूर्णावस्थेत

चिंचवड आणि आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या या दोन्ही स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामे सुरु असून अनेक बांधकामे पुर्णत्वाच्या उंबरठयावर आहेत. हे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होतील. रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबध्द आहे. नियोजीत वेळेत कामे पूर्ण होतील.
हेमंतकुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT