पिंपरी: राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अचानक एक्झिट ही फक्त राजकीयच नाही, तर एक सामाजिक पोकळी निर्माण करणारी आहे. जनसामान्यांना आपलेसे करणारे नेते आणि तितकेच तडफदार, स्पष्ट वक्ते, वेळेचे पक्के नेते अशी त्यांची ओळख होती. राजकारण, शिक्षण, कला अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचे अतुलनीय योगदान होते. पिंपरी-चिंचवडचा खऱ्या अर्थाने विकास करणारे नेते असल्याने अजित पवार यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया...
प्रशासनावर मजबूत पकड
सत्तेत कोणीही असो, राजकीय वातावरण काही असो; परंतु आपण जर अजितदादांसमोर विषय नीटपणे मांडला व त्यांना तो योग्य वाटल्यास ते काम मार्गी लागणारच, असा सामान्य माणसाचा विश्वास होता. तोच अनुभव भूजलविषयक काम करताना मलाही होता. म्हणूनच आम्ही नुकतेच इंद्रायणी नदी पुनरुज्जीवनसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली होती. प्रशासनावर मजबूत पकड असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे, भूजलक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. - उपेंद्र धोंडे (भूजल तज्ज्ञ)
अल्पसंख्याक समाजाचा पाठीराखा
अल्पसंख्याक समाजाचा पाठीराखा, ख्रिस्ती समाजाच्या अडीअडचणीत नेहमी पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्त्व आम्ही गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - ब्र.डेव्हिड काळे (महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद)
कार्यशैली भारावून टाकणारी
अजितदादा पवार हे सर्वसामान्यांचे नेते होते. त्यांची काम करण्याची कार्यशैली भारावून टाकणारी होती. खरे पाहता ते पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचे शिल्पकार होते. - राजेश केळकर
विद्यार्थ्यांना सदैव साथ देणारे दादा
एक करारी नेता महाराष्ट्राने गमावला. अधिकाऱ्यांवरील वचक व कामातील शिस्त यातून दादांनी साधलेला महाराष्ट्राचा व पिंपरी-चिंचवडचा विकास अनंत काळापर्यंत जनता कधीच विसरणार नाही. - अनीश काळभोर (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटना)
विकासाचा ध्यास घेणारे व्यक्तिमत्त्व
अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. - दीपक खैरनार (माहिती अधिकार कार्यकर्ता)
आज शब्द थांबले आहेत
दूरदृष्टी, धाडस आणि प्रशासनाला योग्य दिशा देणारा एक आधारवड कोसळला आहे. दादा, तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी काळ जरी पुढे गेला तरी भरून निघणारी नाही. लोकहितासाठी घेतलेले कठोर निर्णय आणि निर्भीड भूमिका हीच तुमची खरी ओळख राहील. - प्रकाश म्हसे (अध्यक्ष, महाराष्ट्रराज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ)
दादा म्हणजे निर्णयाची धडाडी
दादा म्हणजे विकास, कामाचा वेग, निर्णयाची धडाडी आणि दूरदृष्टिकोन असणारे नेतृत्व. हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयास दादांनी दोन वेळा भेट देऊन कॉलेजची पाहणी केली. अडीअडचणी समजून घेतल्या आणि त्यासंबंधी तिथेच निर्णय घेऊन कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. - प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे (सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे)
विकासाभिमुख राज्यकर्ता
अजित पवार हे प्रजाहितदक्ष, विकासाभिमुख राज्यकर्ते होते. त्यांचे कामाप्रती समर्पण वाखाणण्याजोगे होते. एक कार्यक्षम प्रशासक म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात अजितदादा अजरामर व्यक्तिमत्त्व आहे. पण त्यांच्या कार्यशैलीचा आदर्श भविष्यकाळातील पिढ्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. अशी माणसे नेते म्हणून खूप काळाने निर्माण होतात. तळागाळापर्यंत पोहोचत शाश्वत विकासाचे स्वप्न पाहत आणि ते सत्यात उतरविण्यासाठी सतत झटणाऱ्या कणखर नेतृत्वाची पोकळी न भरून निघणारी आहे. - राजेंद्र घावटे (साहित्यिक)
दादांच्या कार्यातून जनतेप्रती तळमळ
एक कर्तव्यदक्ष, कार्यक्षम व लोकाभिमुख उपमुख्यमंत्री यांच्या दुर्दैवी निधनामुळे राज्याने एक दूरदृष्टीचा नेता गमावला आहे. त्यांच्या कार्यातून जनतेप्रती असलेली तळमळ, प्रामाणिकपणा व निर्णयक्षमता नेहमीच स्मरणात राहील. - प्राजक्ता रुद्रवार (संस्थापिका,अध्यक्ष सहगामी फाउंडेशन)
कायमच जनतेच्या मनात राहतील
राजकारण, समाजकारण या क्षेत्रातील धुरंदर व स्पष्टवक्ता, अभ्यासू, शिस्तबद्ध, कर्तव्यदक्ष नेतृत्व अजितदादा महाराष्ट्राने आज गमावले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, अधिकारी वर्गामध्येसुद्धा त्यांचा दरारा होता, ते महाराष्ट्राचे दादाच होते, आहेत आणि कायम जनतेच्या मनात राहतील. - दीपाली नेहरे
कडक शिस्तीचा काम करणार नेता
सगळ्याचे लाडके, पिंपरी-चिंचवडकरांवर, विशेष प्रेम असलेले आपले अजितदादा पवार. शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय यांच्या प्रश्नांबाबत नेहमीच स्पष्ट भूमिका, कडक शिस्त, स्पष्ट बोलणे, काम करणारा नेता म्हणून ओळख होती. दादा तुम्ही आज पिंपरी- चिंचवडकरांना पोरकं करून गेलात. - अरुणा रामेकर (नर्मदे हर संघ, पिंपरी-चिंचवड)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. सकाळी ही बातमी ऐकताच अनेकांचा यावर विश्वास बसेना. मात्र, प्रसारमाध्यातून निधनाची बातमी ऐकताच सोशल मिडियावरही हळहळ व्यक्त करणाऱ्या पोस्ट दिसू लागल्या.
पिंपरी-चिंचवडच्या विकासामध्ये अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. शहरवासीयांना ही बातमी चटका लावून गेली. शहरवासीयांनी महाराष्ट्र पोरका झाला.... नि:शब्द., महाराष्ट्राची विकासगंगा थांबली, दादा अखेरचा सलाम, कामाचा माणूस,मी कोणाला कळलो नाही. महाराष्ट्रासाठी काळा दिवस,पिंपरी चिंचवडच्या विकासाचा शिल्पकार हरपला, अंगावर खादी...सोबत कामांची यादी शेवटच्या श्वासासोबत दादा भावपूर्ण श्रद्धांजली, संघर्षाचं नाव तू, विश्वासाचा भाव तू, कामाचा माणूस गेला, सर्वसामान्यांचा कैवारी हरपला, अख्खा महाराष्ट्र पोरका झाला, धाडसी नेतृत्व हरपले, महाराष्ट्राचा वाघ असे अनेक प्रकारचे स्टेट ठेवून जनसामान्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याचे दु:ख व्यक्त केले. प्रत्येक स्तरातील व्यक्तींनी सोशल मिडियातून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.