पिंपरी : पवना, इंद्रायणी, मुळा व मुठा नदी सुधार प्रकल्प राबविताना पर्यावरणप्रेमींनी केलेल्या सूचना लक्षात घ्याव्यात. पुराचे पाणी शहरात शिरणार नाही, यादृष्टीने प्रकल्प राबवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या आयुक्तांना दिल्या आहेत.(Latest Pimpri chinchwad News)
पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील पवना, इंद्रायणी, मुळा व मुठा नदीवर राबवण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पांबाबत सोमवारी (दि.29) सकाळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत आढावा बैठक झाली. त्यात ते बोलत होते. बैठकीस पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जलसंपदा विभाग, केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) अशा नदी सुधार प्रकल्पासंबंधित सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुण्याचे आयुक्त नवल किशोर राम, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता दिनकर गोजारे, वन विभागाचे प्रादेशिक उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुनाले, डॉ. हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता दि. म. डूबल, सीएमईचे कर्नल प्रभात सिंग, जलविज्ञान तज्ज्ञ अविनाश सर्वे, केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राचे संचालक श्री शैलम, शास्त्रज्ञ अनिलकुमार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुळा नदीवर राबवण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच, प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली. अजित पवार म्हणाले की, काम करताना जलसंपदा विभागाच्या सूचनांचा प्राधान्याने विचार करा. बदलते वातावरण, नद्यांना येणारा पूर, नदीपात्राची रुंदी, घाटमाथ्यावर व शहर परिसरात पडणाऱ्या पावसाची आकडेवारी, पर्यावरणप्रेमींच्या सूचना अशा सर्व बाबींचा विचार करून काम करावे. भविष्यातील परिस्थितीच्या दृष्टीने प्रकल्पाची आखणी करावी. जैवविविधता, पर्यावरण समतोल व वाढते नागरीकरण याची सांगड घालून सर्वसमावेशक नदी सुधार प्रकल्प राबवण्यासाठी दोन्ही महापालिकांने समन्वयाने काम करावे.
दोन्ही शहरातील नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होणार नाही. शहरात पूराचे पाणी शिरणार नाही. यासाठी ठोस व तातडीनेन उपाययोजना करा, असे आदेशही त्यांना दोन्ही आयुक्तांना दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सोमवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांना सूचना केल्या.