Parking Action Pudhari
पिंपरी चिंचवड

Parking Action: पदपथावरील पार्किंगवर कारवाईचे अजित पवारांचे आदेश; पिंपरीत वाहतूक कोंडीवर उपाय करा

रहाटणीतील जनसंवादात 3 हजार तक्रारी दाखल; महापालिका आयुक्तांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडी वाढल्याने वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. पदपथावर व रस्त्यावर नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करा. रस्ते मोकळे करा. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांना दिले. तसेच, जनसंवाद सभेत तब्बल तीन हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 1 हजार 200 तक्रारींचे निराकरण तात्काळ करण्यात आल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. (Latest Pimpri chinchwad News)

अजित पवार यांचा चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद बुधवार (दि. 15) रहाटणी येथे झाला. त्यापूर्वी त्यांनी पिंपळे सौदागर परिसराची पाहणी केली. त्या पाहणी दौऱ्यात त्यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. जनसंवाद सभेला महापालिका आयुक्त हर्डीकर, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे व विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व राष्ट्रवादी काँग््रेासचे पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.

जनसंवादात पिंपरी-चिंचवड महापालिकेसह समाज कल्याण, पाणीपुरवठा, महसूल, बांधकाम परवानगी, पोलिस, घनकचरा व्यवस्थापन, सिटी सर्व्हे कार्यालय, महावितरण, आरोग्य, रुग्णालय, हाऊसिंग सोसायटी व आरटीओ या विभागांशी संबंधित सर्वांधिक तक्रारी प्राप्त झाल्या.

नागरिकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर अजित पवारांनी स्वत: महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, समाज कल्याण, महावितरण, आरटीओ, पोलिस आयुक्तांशी बोलून संबंधित समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले. जनसंवादात ज्येष्ठ नागरिकांसह, महिला, तरुण, विद्यार्थी तसेच, पक्षाचे माजी नगरसेवक व कार्यकर्ते तक्रार अर्ज घेऊन उपस्थित होते. एकूण 3 हजार तक्रारी करण्यात आल्या. त्यातील निम्मा तक्रारींचे निकारण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. इतर, तक्रारींवर संबंधित विभागाकडून कार्यवाही केली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

माजी नगरसेवकांना तक्रार करण्याचा अधिकार

गेल्या चार वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे महापालिकेत नगरसेवक नाहीत. माजी झाल्याने त्यांचे कोणी ऐकत नाही. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे तक्रार केली. त्यात काही वागणे नाही. माजी नगरसेवकांच्या तक्रारींवर कारवाई करण्यास मी महापालिका आयुक्तांना सांगितले असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

बेकायदा जमीन खरेदी-विक्रीबाबत कारवाई करणार

कार्यक्रमात प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची नोंद करण्यात आली आहे. मी स्वत: विभागीय कार्यालयात जाऊन पुणे विभागीय आयुक्त व महापालिका अधिकाऱ्यांशी संबंधित विषयांवर चर्चा करणार आहे. प्रत्येक विभागाशी संबंधित प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्या जातील. काही ठिकाणी पीएमआरडीएकडे असलेल्या भूखंडांची बेकायदा खरेदी-विक्री होत असल्याचे समोर आले आहे. जे फसवणुकीसमान आहे. अशा जमिनी खरेदी करणे चुकीचे आहे. त्याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT