वडगाव मावळ: ऊस उत्पादन वाढीसाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी व संत तुकाराम साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुध्दिमतेचा (एआय) वापर करण्यात येत आहे. यामध्ये 230 एकर क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येत आहे.
एजन्सीजची नेमणूक
कारखान्यामार्फत सन 2025-26 लागवड हंगामासाठी ऊस उत्पादनात सुधारणा होण्यासाठी उभ्या ऊस पिकावर ड्रोनव्दारे फवारणी करण्यासाठी एजन्सीजची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये व्ही. एस. आय. मांजरी निर्मित वसंत उर्जा, मल्टिमायक्रोन्यूट्रंट व वाढीच्या अवस्थेप्रमाणे मुख्य अन्नद्रव्यांची फवारणी करण्यात येत आहे.
या गावांमध्ये झाली ड्रोनद्वारे फवारणी
कार्यक्षेत्रातील सोमाटणे, कासारसाई, पवनानगर व मरकळ गटातील मौजे दारूंबे, सांगवडे, शिरगाव, धामणे, गोडुंबे, साळुंबे, पाचाणे, उर्से, कासारसाई, नेरे, कडधे, बाम्हणोली, येळसे महागाव, काले, मरकळ या गावातील 230 एकर ऊस क्षेत्रावर ड्रोनव्दारे फवारणी करण्यात आली आहे. मरकळ येथे कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानावर आधारीत ऊस लागवड क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे, माजी संचालक राजाराम लोखंडे, बाळासाहेब लोखंडे, नवनाथ लोखंडे, शंकर लोखंडे तसेच खेड गटातील शेतकी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
35 ते 40 टक्के उत्पादनात वाढ होण्याची शक्यता
कारखाना कार्यक्षेत्रात 2 स्वयंचलित हवामान केंद्र व 21 शेतकरी सहभागी झाले असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी दिली. या योजनेअंतर्गत उपग््राह आधारीत मॅपिंग करून मृदा, आद्रता, सेंन्सर बसविण्यात आले आहेत. ॲपद्वारे हवामान, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व कीड पूर्व सूचना याबाबतच्या शिफारशी शेतकऱ्यांना मिळत आहेत.
त्याचा शेतक-यांना सकारात्मक फायदा होत आहे. यामध्ये 25 ते 30 टक्के अतिरिक्त पाण्याच्या वापरात 30 ते 40 टक्के आवश्यकतेप्रमाणे कीटकनाशके व बुरशीनाशकांची बचत होत आहे. यामुळे किमान 35 ते 40 टक्के ऊस उत्पादनात वाढ होईल, अशी माहिती कार्यकारी संचालक एस. जी. पठारे यांनी दिली.