पिंपळे निलख: पिंपरी-चिंचवड हद्दीतील विविध पोलिस स्टेशन, वाहतूक विभाग यांना पोलिस आयुक्तालय तसेच विविध सामाजिक संस्था, हॉस्पिटल, एनजीओ आदींकडून वाहतूक नियंत्रणासाठी तसेच मोर्चामध्ये नागरिकांना रोखण्यासाठी रस्ता रोखण्यासाठी संरक्षक बॅरिकेड देण्यात येत आहेत. परंतु, पोलिस प्रशासनाकडे आपल्या चौकीला, स्टेशनला किती बॅरिकेड आहेत, ती कोणी दिली आहेत नोंद नसल्याचे पाहणीत दिसून आले. त्यामुळे गरजेनुसार शहरातील रस्त्यांवर लावलेली बॅरिकेड बेवारसपणे पडून असल्याचे चित्र पुढारीच्या पाहणी दौऱ्यात दिसून आले. पोलिस प्रशासनाच्या सावळ्या गोंधळाबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी ज्या पोलिस प्रशासनावर आहे, त्याच प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पिंपळे निलख, पिंपळे सौदागर आणि सांगवी परिसरात पोलिसांचे लाखो रुपयांचे बॅरिकेड्स रस्त्याच्या कडेला, स्मार्ट पादचारी मार्गावर, कचऱ्यात आणि चक्क गटारात बेवारसपणे धूळ खात पडून असल्याचे दिसून येत आहेत. उद्योजक आणि जाहिरातदारांकडून पोलिस प्रशासनाला गणपती उत्सव, सण समारंभ तसेच जयंतीच्या काळात वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच नेतेमंडळींचे दौर सुरक्षित करण्यासाठी या बॅरिकेडचा उपयोग होतो.
यामुळे वाहतूक सुरळित करण्यास मदत होते. परंतु, पोलिस प्रशासनाने खरेदी केलेली व भेट मिळालेल्या शेकडो बॅरिकेड्स आज उपनगरांमध्ये धूळ खात रस्त्यांवर, अडगळीत पडलेली दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी या बॅरिकेड्सची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, ते नेमक्या कोणत्या विभागाचे आहेत हे ओळखणेही कठीण झाले आहे. काही ठिकाणी हे लोखंडी सांगाडे झाडांवर पडले असून, वृक्षांची हानी होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही खासगी व्यावसायिकांनी हे बॅरिकेड्स स्वतःच्या पार्किंगसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे, तर काही ठिकाणी हे साहित्य भंगाराच्या ट्रकमधून लंपास केले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
नोंद कोणाकडेच मिळेना
शहरात व्हीआयपी बंदोबस्त किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हे बॅरिकेड्स मोठ्या उत्साहात नेले जातात. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर ते परत आणण्याची तसदी कोणीही घेताना दिसत नाही. बंदोबस्तासाठी किती बॅरिकेड्स बाहेर गेले आणि किती परत आले? याचा कोणताही अधिकृत हिशोब किंवा नोंद पोलिसांकडे नसल्याचे वास्तव समोर आले आहे. पोलिसांच्या या मआओ जावो घर तुम्हारा वृत्तीमुळे शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख आदी भागांत आम्ही लावलेली बॅरिकेड्सची पाहणी करून जेथे पडलेली असतील ती तात्काळ उचलून आणण्यात येतील. यापुढे असे बॅरिकेड्स कुठेही बेवारस पडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.सुदाम पाचोरकर, वाहतूक पोलिस निरीक्षक, सांगवी.
नागरिकांचा संतप्त सवाल
सामान्य नागरिकांना हेल्मेट किंवा सिग्नल तोडल्यावरून शिस्तीचे धडे देणारे पोलिस स्वतःच्या मालमत्तेबाबत इतके निष्काळजी कसे असू शकतात? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर रक्षकच भक्षक बनून सार्वजनिक मालमत्तेची अशी धूळधाण करत असतील, तर नागरिकांनी कोणाकडे आदर्श पाहावा, असा संताप पिंपरी-चिंचवडकर व्यक्त करत आहेत.
सांगवी परिसरात तसेच पोलिस स्टेशन हद्दीत जे काही बेवारस बॅरिकेड्स पडलेली आहेत, त्याची पाहणी करून संबंधितांना ती त्वरित उचलण्यास सांगितली जातील.जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी.सांगवी परिसरात तसेच पोलिस