पिंपरी: नुकत्याच पार पडलेल्या विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट आणि डीजेचा वापर करणाऱ्या 40 मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 223 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये वाकड पोलिस ठाणे क्षेत्रात 17, पिंपरी 8, निगडी 5, सांगवी 5, दापोडी 3 आणि तळेगाव दाभाडे 2 अशा एकूण 40 मंडळांवर कारवाई करण्यात आल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.
नॉईज लेवल मीटरचा वापर
गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकांदरम्यान डीजे व लेझर बीम लाईटसह कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या यंत्रणांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले होते. नॉईज लेवल मीटरद्वारे विविध ठिकाणी आवाजाची पातळी तपासण्यात आली. मर्यादेपेक्षा जास्त आवाज झालेल्या प्रकरणात संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले. (Latest Pimpri News)
सहायक पोलिस आयुक्तांकडून या प्रकरणांची प्राथमिक चौकशी सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी यापूर्वीच डीजे व लेझर बीमच्या वापरावर कठोर बंदी घालून मनाई आदेश जारी केले होते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले होते. त्यानुसार, संपूर्ण आयुक्तालय हद्दीत मोठ्या प्रमाणावर तपासणी करुन 40 मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे दाखल झालेली पाच प्रमुख मंडळे
1) आकुर्डीतील शिवाजी मित्र मंडळाच्या मिरवणुकीत डीजे व लेझर बीमचा वापर झाला. याबाबत मंडळ अध्यक्ष सुरज मारुती पिंजण यांच्यासह डीजे चालक-मालक, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
2) सुदर्शन मित्र मंडळ, आकुर्डी येथे डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याने अध्यक्ष आदित्य सुनील शिंदे, डीजे मालक क्षितिज शहा व बीम लाईट मालक सिद्धांत यादव यांच्यावर कारवाई करण्यात आली.
3) भोसरीतील दिघीरोड मंडळाच्या मिरवणुकीत अध्यक्ष प्रथमेश गवळी, उपाध्यक्ष आकाश गवळी, डीजे मालक अर्जुन पवार आणि ट्रॅक्टर चालक हेमला चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
4) भोसरीतील लोंढे आळी मंडळाच्या अध्यक्ष आर्यन सपकाळ, डीजे मालक प्रवीण सावंत, ट्रॅक्टर चालक गोपाळ राठोड यांच्यावर ध्वनी प्रदूषण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
5) शास्त्री चौक मंडळ, भोसरीच्या अध्यक्ष स्वप्नील बुर्डे, डीजे मालक दर्शन ओव्हाळ व ट्रॅक्टर चालक गोपाळ (रा. कर्नाटक) यांच्यावरही कारवाई करण्यात करण्यात आली.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले होते. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने एकूण 40 मंडळांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.- डॉ. विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन, पिंपरी- चिंचवड