पिंपरी: महापालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो)कडून निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, गवळीमाथा चौक, भोसरी डिस्ट्रीक्ट सेंटर, गोदाम चौक, पीआयईसी, मोशीहून चाकणच्या दिशेने जाणार आहे.
या 40.946 किलोमीटर अंतराच्या मार्गाचा 10 हजार 383 कोटी 89 लाख रुपये खर्चाचा प्रकल्पाचा डीपीआर महामेट्रोने करून पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे सादर केला आहे. (Latest Pimpri News)
दापोडी ते पिंपरी मार्गावर कासारवाडीतील नाशिक फाटा मेट्रो स्टेशनला महामेट्रोने भोसरी असे चुकीचे नाव दिले आहे. ते नाव बदलण्याबाबत नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून महामेट्रोकडे सातत्याने विचारणा होत आहे. मात्र, व्यवस्थापनाकडून त्या स्टेशनच्या नावात बदल केला जात नसल्याने नाराजी कायम आहे.
अशी परिस्थिती असताना प्रत्यक्षात भोसरी मेट्रो स्टेशन व्हावे, अशी भोसरी व एमआयडीसी परिसरातील नागरिकांची प्रलंबित मागणी आहे. नव्या मेट्रो मार्ग भोसरीतून न नेता गवळीमाथा येथून इंद्रायणीनगर, मोशी येथून नेण्यात आला आहे. परिणामी, भोसरी येथे मेट्रो स्टेशन होणार नसल्याचे समोर आले आहे. त्याबाबत ‘पुढारी’ने नव्या मेट्रो मार्गातही भोसरीला डच्चू असे ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या बातमीवरून भोसरीत मेट्रो स्टेशन व्हावे, अशी मागणीने जोर धरला आहे.
दरम्यान, शहरातील लोकप्रतिनिधींसमोर महामेट्रोने या मार्गाचे सादरीकरण केले. त्यात लोकप्रतिनिधींनी भोसरी स्टेशनचा मुद्दा उपस्थित केला. भोसरीतील उड्डाण पुलामुळे नव्या मार्गातून भोसरी परिसर वगळण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावर गरज असल्यास उड्डाण पूल पाडण्यास हरकत नाही, असे मत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. त्यासंदर्भात महामेट्रोच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाप्रमाणे हा उड्डाण पूल पाडावा लागणार आहे. तसेच, अडथळा ठरणारा शीतल बाग येथील लोखंडी पादचारी मार्गही पाडला जाऊ शकतो. हा पर्यायाला महापालिकेने ग्रीन सिग्नल दिल्यास पूल व पादचारी पुल जमीनदोस्त करून मेट्रो मार्ग होऊ शकतो. मात्र, त्यामुळे महापालिकेचे तब्बल 107 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. उड्डाण पूल पाडल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
वाहतूक कोंडीत भर पडण्याची भीती
भोसरी येथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. पुणे-नाशिक महामार्ग, भोसरी तसेच, आळंदी व दिघीकडे ये-जा करणारी वाहतूक रहदारी मोठी आहे. राजमाता जिजाऊ उड्डाण पूल पाडल्यास वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. मेट्रो मार्गामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होण्याऐवजी त्यात अडकून पडण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
निगडीप्रमाणे उड्डाण पुलाशेजारून मेट्रो न्यावी
निगडी येथे उड्डाण पुलाशेजारून सर्व्हिस रस्त्यावरून मेट्रो मार्ग तयार करण्यात येत आहे. त्याप्रमाणे भोसरी येथील उड्डाण पूल कायम ठेवून त्याच्या शेजारुन मेट्रो मार्ग नेता येऊ शकतो. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळणार आहे. तसेच, वाहतुकीस अडथळाही निर्माण होणार नाही. त्या पर्यायाचा महामेट्रोने विचार करावा, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
भोसरी मेट्रो स्टेशनबाबत पाहणी सुरू आहे
निगडी ते चाकण या मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करून पिंपरी-चिंचवड महापालिकेस सादर केला आहे. संदर्भात पिंपरी-चिंचवड लोकप्रतिनिधींसमोर सादरीकरण करण्यात आले. त्या डीपीआरवर प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यानुसार, भोसरी येथून मेट्रो मार्गाचा पर्यायाबाबत पाहणी करण्यात येत आहे. भोसरी उड्डाण पुलाबाबत आताच काही सांगता येत नाही, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
पर्यायाची पडताळणी करण्यात येत आहे.
नाशिक फाट्याहून भोसरीला जाताना एका बाजूस सीएमई आणि दुसऱ्या बाजूला सीआयआरटी व एमआयडीसीचे मोठे क्षेत्र आहे. नव्या मेट्रो मार्गासाठी नाशिक फाट्याहून थेट भोसरीकडे तेथून मोशीला जाण्यासाठी भौगोलिक पर्यायाची पडताळणी करण्यात येत आहे. महामेट्रो व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याचे तांत्रिक पथक एकत्रित अभ्यास करीत आहे. पुढील बैठकीत त्याबाबतचा अहवाल सादर केला जाईल. त्यानुसार, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.