

राहुरी: शेतीचा खर्च आणि उत्पन्न याचे गणित जुळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने शब्द दिलेल्या कर्जमाफीकडे शेतकरी डोळे लावून बसला असताना, दुसरीकडे बँकांनी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ‘राष्ट्रीय लोक अदालत’च्या नावाखाली थेट नोटीसा पाठवल्या आहेत. नोटीसीमध्ये ‘कारवाई’ची भाषा असल्याने शेतकरी घाबरून गेल्याचे चित्र आहे.
राहुरी तालुक्यात अनेक सहकारी सोसायटींकडून थकीत कर्जाची वसूली सुरू आहे. त्यात आता राष्ट्रीय कृत बँकांनीही वसुली हातात घेतली आहे. महाराष्ट्र बँकेने शेतकर्यांना नोटीसा पाठवून शनिवार दि. 13 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे कळविले आहे. (Latest Ahilyanagar News)
तसेच कर्जाची रकम भरणा केला तर ‘पुढील कोर्ट कारवाई’तून मुक्तता मिळेल, असाही अप्रत्यक्ष दम भरला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, ज्यांनी शब्द दिला त्याच सरकारने फसवले असल्याने आता न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामध्ये कोरोनात मयत झालेल्या शेतकर्यांच्या नावेही नोटीसा बजावल्या आहेत.
आत्महत्या करू नका: औताडे
नगर जिल्ह्यामध्ये बँकेच्या व शासनाच्या दुटप्पी व असंवेदनशील भूमिकेमुळे शेतकरी आत्महत्यात दुर्दैवाने वाढ होत आहे. जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेल्या वसुली केसेसबाबत कुठलीही भीती न बाळगता जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. कुठल्याही शेतकर्यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये. शेतकरी संघटना आपल्या पाठीशी राहील व राज्य सरकारला शेतकर्यांची कर्जमुक्ती करण्यास भाग पाडेल, असे आवाहन अनिल औताडे यांनी केले.
शेतकर्यांचा अंत पाहू नकाः प्राजक्त तनपुरे
‘देवाभाऊ’ सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी कर्जमाफीचा शब्द दिला होता. त्याचा आता त्यांना विसर पडला. शासनाने शेतकर्यांची फसवणूक करू नये. शेतकर्यांवर जर कर्ज वसुलीसाठी नोटीसा पाठवून दबाव आणला जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाहीत. शासनाने आणखी अंत न पाहता तत्काळ कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा. असे आवाहन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंना भेटणार: रवी मोरे
सरकारने कर्जमाफीचा शब्द दिला आहे. आज ना उद्या कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे बँकेने घाई करू नये. तसेही अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जर बँकेने नोटीस पाठवून शेतकर्यांना वेठीस धरले, तर शेतकरी सेनेच्या वतीने आंदोलन छेडले जाईल. मी या प्रश्नावर आमचे पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, असे शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले.