संतोष शिंदे
पिंपरी: गंभीर गुन्ह्यातील आरोपी कायदेशीर पळवाटा शोधून जामिनावर बाहेर पडतात आणि लगेचच पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय होतात. मात्र, आता या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘सुटला की धरला’ हा फॉर्म्युला राबवण्यास सुरुवात केली आहे. मागील सात महिन्यांत शहरातील गंभीर गुन्ह्यांतील 338 आरोपी जामिनावर सुटले आहेत. त्यापैकी तब्बल 315 जणांना ठाण्यात आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.
जामीन रोखण्यासाठीचे प्रयत्न
जामीन प्रक्रियेत आरोपींना सुटका मिळू नये, यासाठी पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न केले जातात. सरकारी वकिलांमार्फत ठोस युक्तिवाद करून न्यायालयाला आरोपीची पार्श्वभूमी दाखवली जाते. (Latest Pimpri News)
मात्र, आरोपींचे वकील कायदेशीर पळवाटा शोधून जामीन मिळवतात. आरोपी तुरुंगातून बाहेर पडताना विजय साजरा करतात; मात्र आता लगेचच पोलिस ठाण्यात ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई झाल्याने त्यांची मस्ती उतरते. या पद्धतीमुळे गुन्हेगारांच्या मानसिकतेला लगाम बसत असल्याचे चित्र दिसून येते.
वरिष्ठ अधिकार्यांचा आढावा
सुटला की धरला ही कार्यपद्धती सर्व पोलिस ठाण्यांना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कारवाईचा आढावा वरिष्ठ अधिकारी स्वतः घेतात. जामिनावर सुटलेल्या प्रत्येक आरोपीची नोंद यादीत केली जाते. त्यानंतर गोपनीय पथके व स्थानिक कर्मचारी आरोपींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवतात. पोलिस आयुक्तालयात दर पंधरवड्याला या कारवाईची आकडेवारी सादर केली जाते.
तंबी, सल्ला अन् धाक
प्रतिबंधात्मक कारवाईच्या वेळी आरोपींना पोलिसांकडून ठाण्यात आणून कडक तंबी दिली जाते.पुन्हा गुन्ह्यात दिसलास, तर तुला सुट्टी नाही असे ठणकावून सांगितले जाते. काही प्रकरणांत आरोपींच्या कुटुंबीयांनाही बोलावून सामाजिक दबाव आणला जातो. अशा प्रकारे दिलेल्या धमकीवजा सल्ल्यामुळे आरोपी काही काळ शिस्तीत राहतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
गुन्हेगार खरंच सुधारतात का?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तंबीनंतर काही आरोपी प्रत्यक्षात गुन्हेगारीपासून दूर गेले आहेत; मात्र हा बदल कायमस्वरूपी आहे का, हा प्रश्न विचारला जात आहे. कारण भीतीपोटी काही काळ शांत बसलेले गुन्हेगार संधी मिळताच पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात. त्यामुळे अशा आरोपींचे समुपदेशन करून मानसिकता बदलणेही तितकेच गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
नागरिकांचा वाढता विश्वास
मोठ्या शहरात वाहनचोरी, दरोडे, घरफोड्या, बलात्कार, खून असे गंभीर गुन्हे घडत असतात. यातील आरोपी जामिनावर सुटल्यावर परिसरात पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या या कारवाईनंतर गुन्हेगारांना बसलेला जरब येथील नागरिकांना जाणवू लागला आहे. लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या या फॉर्म्युलाबाबत नागरिक सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.
जामिनावर सुटला म्हणजे तो मोकळा झाला, असे नाही. गुन्हेगाराच्या प्रत्येक हालचालीवर आमची नजर असते. वारंवार गुन्ह्यात सापडणार्या सराईतांवर कठोर कारवाई केली जात आहे.- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडसारख्या झपाट्याने वाढणार्या शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे. आरोपी जामिनावर सुटल्यावर त्याची हालचाल समाजात मोठा परिणाम करते. ‘सुटला की धरला’ ही कार्यपद्धती गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करत आहे. मात्र, कायद्यात बदल तसेच न्यायालयीन पातळीवर जामीन मंजुरीचे निकष आणखी कठोर होणे गरजेचे आहे. अन्यथा एकट्या पोलिसांची धडपड गुन्हेगारी थोपवण्यासाठी अपुरी ठरेल.- मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, पिंपरी- चिंचवडर