

पिंपरी: पुण्यातील गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी तसेच, गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून नागरिक मोठ्या संख्येने जात आहेत. त्यामुळे मेट्रोत तुफान गर्दी होत आहे. शनिवारी (दि.30) व रविवारी (दि.31) असे दोन दिवसांत अतिरिक्त पावणेदोन लाख नागरिकांनी मेट्रोतून प्रवास करीत गणरायाचे दर्शन घेतले.
पुण्यातील गणपती व देखावे पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड व परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक जातात. मित्रमंडळी व सहकुटुंब जाण्याचे प्रमाण मोठे आहे. ही बाब लक्षात घेऊन मेट्रोने सकाळी सहा ते रात्री अकरा ही वेळ वाढून सकाळी सहा ते रात्री दोन अशी मेट्रो सुरू केली आहे. (Latest Pimpri News)
शनिवारी व रविवारी या साप्ताहिक सुटीच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. मेट्रोने प्रवास करून पुणे शहराच्या मंडई स्टेशन येथे उतरून देखावे पाहण्यास अधिक पसंती देत आहेत. तसेच, कसबा पेठ, स्वारगेट व पुणे मनपा स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी वाढली आहे.
पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर नियमितपणे दिवसभरात 1 लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रोची वेळ शनिवारपासून वाढली. त्या दिवशी विक्रमी 2 लाख 1 हजार 343 जणांनी मेट्रोतून प्रवास केला. तब्बल 1 लाख लोकांनी गणेशोत्सवाचा आनंद घेतल्याचा या आकडेवारीवरून समोर येत आहे.
दुसर्या दिवशी रविवारी 1 लाख 79 हजार 856 जणांनी मेट्रोतून प्रवास केला. ही संख्या नियमित संख्येपेक्षा 80 हजारांने अधिक आहे. गच्च भरलेल्या मेट्रोत अधून मधून गणपती बापा मोरयाचा जयघोष ऐकू येत आहे. नागरिक सुरक्षितपणे प्रवास करण्यासाठी मेट्रोला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.1) रात्रीपर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केल्याचे आकडेवारी अहे.
दरम्यान, येत्या शुक्रवार (दि.5) पर्यंत मेट्रो रात्री दोनपर्यंत धावणार आहे. तर, अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी (दि.6) मेट्रो रात्रभर धावणार आहे. मेट्रो त्या दिवशी सकाळी सहापासून दुसर्या दिवशी रविवारी (दि.7) रात्री अकरापर्यंत धावणार आहे.