

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवात आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भावी नगरसेवक तसेच, इच्छुकांची चमकोगिरी सुरु झाली आहे. शहरात विशेषत: प्रभागात फ्लेक्स, बॅनर तसेच, स्वागत कमानी लावून नागरिकांवर प्रभाव पाडला जात आहे. त्यामुळे शहर विद्रुप होत असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस, स्वागत, निवडणूक, धार्मिक व अन्य कार्यक्रमांचे अनधिकृत फ्लेक्स लावले जातात. यामुळे शहर विद्रुप होते. वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनधिकृत फलक लावू नयेत, यासाठी सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी व शहराध्यक्षांना महापालिकेने पत्राद्वारे आवाहन केले. (Latest Pimpri News)
आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या वतीने वेळोवेळी अनधिकृत फलक, पोस्टर्स, किऑस्कवर कारवाई केली जात आहे. असे असतानाही शहरात अनिकृत फ्लेक्सची संख्या काही घटन नसल्याचे चित्र आहे.
महापालिकेची निवडणूक दिवाळीनंतर होणार आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुक रिचार्ज झाले आहेत. त्यांनी प्रसिद्धीसाठी सर्व तंत्राचा वापर सुरू केला आहे. प्रसिद्धीची कोणतीही संधी ते सोडत नाहीत. शहरातील विविध चौका-चौकात फ्लेक्स लावले जात आहेत.
गणेशोत्सवानिमित्त स्वागत, आधारस्तंभ, मुख्य सल्लागार, युवा नेते, भावी नगरसेवक, दादा, अण्णा आप्पा, भाऊ असे फ्लेक्स प्रभागासह झळकत आहेत. विशेषत: सार्वजनिक गणेश मंडळाचा परिसर, चौक, वर्दळीच्या ठिकाणी, बस थांबे तसेच, गणेश विसर्जन घाट आदी जागा मिळेल त्या ठिकाणी फ्लेक्स लावले जात आहेत. त्यात सत्ताधार्यांसह विरोधी पक्षातील माजी नगरसेवक व इच्छुकांचा समावेश आहे.
शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्समुळे विद्रुपीकरण वाढले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची चमकोगिरी पाहायला मिळत आहेत. अशा अनधिकृत फ्लेक्स, बॅनर व होर्डिंगवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. सण, उत्सव, कार्यक्रम, वाढदिवस पार पडल्यानंतर ते अनधिकृत फ्लेक्स व बॅनर हटविले जात असल्याचे बोलले जात आहे.
अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग लावल्यास गुन्हा
महापालिकेने शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आकाश चिन्ह व परवाना विभागाने एक एप्रिल ते 31 जुलै या चार महिन्यात 47 हजार 13 पोस्टर्स, फलक, किऑस्कवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून चार लाख 68 हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात अनधिकृत फलक लावू नयेत. महापालिकेने परवानगी दिलेल्या अधिकृत होर्डिंगवरच जाहिरात करावी. परवानगी न घेता जाहिरात फलक, किऑक्स लावणार्यांवर फौजदारी व दंडात्मक कारवाई केली जाईल, असे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी सांगितले.