Three-month water tax revenue report
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील वर्षापासून मालमत्ताकराच्या बिलासोबतच पाणीपट्टीची वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महसूल वाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या 1 एप्रिल ते 30 जून या तीन महिन्यात 15 कोटी 53 लाख 11 हजार 730 रुपयांची पाणीपट्टी जमा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 45 लाख रूपयांनी अधिक पाणीपट्टी जमा झाली आहे.
शहरातील निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा एकूण 1 लाख 80 हजार 906 नळजोडधारक आहेत. त्यांच्याकडून विविध माध्यमांतून पाणीपट्टी भरली जात आहे. शहरात सुमारे 32 हजार 460 नळधारकांकडून पाणीपट्टी थकली आहे. थकबाकीदारांनी लवकरात लवकर पाणीपट्टी भरावी; अन्यथा नळजोड खंडीत करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिला आहे. (Latest Pimpri News)
नागरिकांनी वेळेवर पाणीपट्टी बिल भरावे
मालमत्ताकराच्या बिलासोबत पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. नागरिकांनी वेळेत मालमत्ताकर व पाणीपट्टी भरून महापालिकेस सहकार्य करावे. थकबाकीदारांवर कारवाई केली जात आहे. बिल भरून ती कारवाई टाळावी, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.
पाणीमीटर तातडीने दुरुस्त करून घ्या
पाणीपुरवठा विभागामार्फत नळजोड असलेल्या ग्राहकांना लवकरच नादुरुस्त किंवा बंद असलेले पाणी मीटर दुरुस्त करण्याबाबत नोटीस देण्यात येणार आहे. सध्या अनेक ठिकाणी पाणीपट्टी मीटर नादुरुस्त असल्याने रिडिंग घेणे शक्य होत नाही. त्यामुळे बिलात अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन पाणी मीटर लवकरात लवकर दुरुस्त करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.
असा जमा झाले पाणी बिल
ऑनलाईन : 6 कोटी 53 लाख 5 हजार 159
धनादेश : 5 कोटी 90 लाख 98 हजार 585
रोख : 3 कोटी 9 लाख 7 हजार 986
एकूण : 15 कोटी 53 लाख 11 हजार 730