Latest

PFI वर डिजिटल स्ट्राइक, संघटनेचे अधिकृत ट्विटर अकाउंट केले बंद

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधातील भारतातील कारवाईनंतर आता पीएफआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर निर्बंध घालण्यात आले आहेत. कायदेशीर मुद्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील PFI च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर डिजीटल स्ट्राइक करण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या बंदीनंतर महाराष्ट्र सरकारने PFI आणि त्याच्या सहयोगी अथवा संलग्न संस्था, फ्रंटना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करणारा आदेश जारी केला आहे.

केंद्र सरकारने पीएफआय विरोधात मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संघटनेवर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. पीएफआयसह तिच्या ९ सहयोगी संघटनांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. पीएफआय सोबतच कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय), रिहैब इंडिया फाउंडेशन (आरआयएफ), ऑल इंडिया इमाम काउंसिल (एआयआयसी), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्यूमन राईट्स ऑर्गनायजेशन (एनसीएचआरओ), नॅशनल व्हिमेन फ्रंट, ज्यूनियर फ्रंट, एम्पावर इंडिया फाउंडेशन तसेच रिहैब फाउंडेशन (केरळ) या संघटनांवर केंद्राने बंदी घातली आहे.

PFI आणि संलग्न संघटनांचा दहशतवाद आणि त्यासाठी वित्तपुरवठा, भीषण हत्या, देशाच्या संवैधानिक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाच्या सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला प्रतिकूल ठरणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आल्याचे स्पष्ट करीत बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध अधिनियम,१९६७ च्या तरतुदीनूसार ही कारवाई करण्यात आलयाचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांनी पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केंद्राकडे केली होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) राज्य पोलीस तसेच तपास यंत्रणेच्या सहकार्याने पीएफआयच्या ठिकाणांवर धाडी टाकत संघटनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी केरळमधून पीएफआय सदस्य शफीक पैठला एनआयएने अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून पंतप्रधानांच्या पाटणामधील सभेला पीएफआय लक्ष्य करणार होती, अशी माहिती समोर आली होती. याशिवाय संघातील मोठे नेते तसेच संघ मुख्यालय पीएफआयच्या टार्गेटवर होते, अशी माहिती समोर आली आहे.

१७ फेब्रुवारी २००७ मध्ये पीएफआयची स्थापना झाली होती. दक्षिण भारतातील तीन मुस्लिम संघटना नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट (केरळ), फोरम फॉर डिग्निटी (कर्नाटक) तसेच मनिथा नीती पसराई (तामिळनाडू) यांना एकत्रित करीत पीएफआयची स्थापन करण्यात आली होती. स्थापनेपासूनच पीएफआय वर समाजविरोधी तसेच देशविरोधी कृत्ये करण्याचा आरोप करण्यात आले होते. सध्या देशातील २३ राज्यांमध्ये ही संघटना सक्रिय आहे. स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंटवर (सिमी) बंदी घातल्यानंतरच पीएफआयचा विस्तार वेगाने झाला.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT