जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर अजुनही चढ्या स्तरावर असल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल-डिझेल दरात लिटरमागे प्रत्येकी 35 पैशांनी वाढ केली. ( Petrol-Diesel Prices Hike ) ताज्या दरवाढीनंतर इंधनाचे दर नव्या सर्वकालीन उच्चांकी स्तरावर गेले आहेत. मुंबईमध्ये पहिल्यांदाच पेट्रोल दर 112 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 102.89 रुपयांवर गेले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरात सातत्याने वाढ सुरु आहे. ( Petrol-Diesel Prices Hike ) जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दराने उसळी घेतल्याचे कारण देत तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरु आहे. 24 सप्टेंबर पासून सुरु असलेली इंधन दरवाढ अद्यापही थांबलेली नाही. विशेषतः पेट्रोलच्या तुलनेत डिझेल दरात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली आहे. गत 20 दिवसांमध्ये डिझेल दरात 6.30 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. बुधवारच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल 112.11 रुपयांवर गेले आहे.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे लिटरचे दर 106.19 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 94.92 रुपयांवर गेले आहेत. तामिळनाडूतील चेन्नईमध्ये हेच दर क्रमशः 103.31 व 99.26 रुपयांवर गेले आहेत. तर प. बंगालमधील कोलकाता येथे हे दर 106.78 आणि 98.03 रुपयांवर गेले आहेत.