संगमनेर शहर : संगमनेर तालुक्यातील प्रवरा उजव्या कालव्यावर ओझर ते सोनगाव दरम्यान असलेल्या पाटचार्यावरील कर्मचारी हा शेतकर्याकडून पाटपाण्यासाठी बेकायदेशीरपणे वसुली करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कर्मचार्याची तत्काळ बदली करण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कर्मचारी शिरोळे यांची प्रवरा उजव्या कालव्यावरील चारी क्रमांक 1 ते 20 वर कालवा निरीक्षकांची जागा रिक्त असल्याने तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. हा कर्मचारी रोटेशन दरम्यान पाटपाण्यासाठी आवश्यक असलेला फॉर्म भरण्यासाठी प्रति एकर 500 रुपये व फॉर्म फी म्हणून 100 असे 600 रुपये शेतकर्यांकडून वसूल करत आहे, तर काही शेतकर्यांकडून एकरासाठी तीन वेळा पैसे वसूल केल्याचा गंभीर आरोप करून हा कर्मचारी फॉर्म भरल्याची पोहोच पावती अथवा शेतकर्यांची सही घेत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आमच्याकडून हा कर्मचारी किती क्षेत्राचे पैसे घेतो. याचा कोणताही खुलासा होत नसल्याने आमच्यावर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
काही शेतकर्यांना वैयक्तिक उपसा करण्याची परवानगी असताना कर्मचारी शिरोळे हा 500 ते 1 हजार रुपये घेऊन कोणतीही पावती देत नाही, तसेच त्याने वसुलीसाठी एका खासगी व्यक्तीची नेमणूक केली आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे.
शेतकरी व या कर्मचार्यामध्ये मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या कर्मचार्याची तत्काळ बदली करून या ठिकाणी कालवा निरीक्षकांची नेमणूक करण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आह, तर वरिष्ठ अधिकार्यांच्या परवानगीशिवाय हा कर्मचारी बेकायदेशीर वसुली करू शकत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शिरोळे या कर्मचार्याची बदली न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा ओझर ते सोनगाव येथील शेतकर्यांनी दिला आहे.
हेही वाचा: