नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या ( Parliament special session: रणनीतीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (दि. ५)काँग्रेस संसदीय रणनीती गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान सोनिया गांधी भूषवणार आहे. दरम्यान, सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना सौम्य ताप आल्याने शनिवारी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (दि.४सप्टेंबर) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
काँग्रेस घेणार समविचारी विरोधी पक्षांची बैठक : वेणुगोपाल
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, "उद्या आम्ही संसदीय रणनीती गटाची बैठक बोलावत आहोत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी समविचारी विरोधी पक्षांची बैठकही बोलवली आहे. संसदेच्या अधिवेशनासाठी आम्ही आमच्या रणनीतीवर चर्चा करू.
भाजपविरोधी पक्षांनी इंडिया नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया) आघाडीची स्थापना केली आहे. नुकतीच इंडिया आघाडीची मुंबईत बैठक झाली. यावेळी आगामी लोकसभा निवडणूक संयुक्तपणे लढवण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला.
१८ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार्या विशेष अधिवेशनादरम्यान दहाहून अधिक महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, आम्हाला अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. संसद केंद्र सरकारच्या इच्छेनुसार चालते. हिवाळी अधिवेशन होणार असताना हे अधिवेशन बोलावण्याची कोणती आणीबाणी होती, असा सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) खासदार बिनॉय विश्वम यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहर नाही, असे सरकारने जाहीर केले आहे. या प्रकरणी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, असे आवाहन त्यांनी पत्राच्या माध्यमातून केले आहे. विशेष अधिवेशनाद्वारे सरकारला संदेश द्यायचा आहे की 'संसदेतील बहुमतामुळे संसदीय व्यवस्था पूर्णपणे मोडून काढण्यात सक्षम झाले आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :