नागपूर; पुढारी वृत्तसेवा : 'सुरमणी' या उपाधीने गौरविण्यात आलेले नागपूरचे पंडीत प्रभाकर धाकडे गुरुजी यांचे निधन झाले. आज ( दि. ८) सायंकाळी झिंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. १ तारखेला त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ह्दयावरील उपचार पूर्ण झाल्याने यकृत, मूत्रपिंड व फूफ्फूसांच्या संक्रमणावर उपचारासाठी त्यांना शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वर्धा रोड वरील स्वास्थम या दुस-या रुग्णालयात घेऊन जात असताना, रुग्णवाहिकेतच त्यांना ह्दयघाताचा झटका आला आणि त्यांची प्राण ज्योत मालवली. हे वृत्त पसरताच गुरुजींच्या सुरेल व्हायोलिनचे सूर नेहमीसाठी शांत झाले अशी भावना संगीतप्रेमींनी व्यक्त केली. धाकडे गुरुजी यांची पाच दशकांहून अधिक काळातील संगीताची साधना होती. आजवर हजारो सुरेल विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले आहेत. (Pandit Prabhakar Dhakade)
'भास्कर संगीत विद्यालयाचे बालाजीपंत धाकडे यांनी १९६६ साली गायन शाळेची सुरवात केली. पुढे सुरमणी पं. प्रभाकर धाकडे या त्यांच्या मुलाने शास्त्रीय गायनाची धुरा सांभाळली. पं. प्रभाकर धाकडे यांनी संगीतबद्ध केलेल्या चालींवर शंकर महादेवन, हरीहरन, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, सुरेश वाडकर यांच्या सारख्या दिग्गज पार्श्वगायकांनी बुद्ध गीते व गजलांचे गायन केले आहे. 'भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहेस' ही त्यांची कॅसेट अत्यंत लोकप्रिय झाली.
Pandit Prabhakar Dhakade : सूरसिंगार मुंबईतर्फे 'सूरमणी' ही उपाधी
२००९ साली प्रभाकर धाकडे आकाशवाणीतून निवृत्त झाले. ते शास्त्रीय असो किंवा सुगम संगीत फक्त संगीताप्रतीच ते पूर्णपणे समर्पित राहीले. १९८३ मध्ये त्यांना सूरसिंगार मुंबईतर्फे 'सूरमणी'ही उपाधी प्राप्त झाली. त्याच वर्षी जपान येथे झालेल्या दिव्यांगांच्या संमेलनात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. पुन्हा १९९० साली त्यांना ही संधी दुस-यांदा मिळाली. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणा-या गुरुजींच्या थोरल्या मुलाने मिलिंद धाकडे याने देखील मुंबईत चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून नावलौकिक कमावला आहे. 'वळू', 'विहीर' 'देऊळ' तसेच 'आजचा दिवस माझा' या चित्रपटांना मंगेश धाकडे याने संगीत दिले होते. त्यांच्या मागे पत्नी उर्मिला, तीन मुले सूना व नातू असा परिवार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.