पुढारी ऑनलाईन डेस्क : Yuzvendra Chahal T20 World Cup 2022 IND vs PAK : टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होण्यास दोन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याबद्दल मीडिया आणि चाहत्यांना उत्सुकता आहे. विशेषत: इंटरनेटवर सातत्याने विविध प्रकारचा डेटा काढला जातो आणि दाखवला जात आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ या सामन्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा त्यांच्या मनात गेल्या वर्षीच्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाची आठवण पुन्हा एकदा ताजी होईल.
भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) पहिला टी 20 विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र याआधी त्याने पाकिस्तानचा सामना केला आहे. आशिया कप 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो संघाचा भाग होता. एका प्रसिद्धा हिंदी दैनिकाला मुलखत देताना चहल म्हणाला, 'पाकिस्तान हा एक चांगला संघ आहे पण भारताकडे त्यांच्याविरुद्ध खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा त्यांचा सामना करण्याची चिंता नाही. मीडिया आणि इंटरनेटवर या सामन्याबद्दल सातत्याने मोठ्या गोष्टी लिहिल्या आणि बोलल्या जात असल्या तरी आमच्यासाठी हा आणखी एका सामन्यासारखा आहे. कारण जर जास्त विचार केला तर दबाव निर्माण होईल. मी इंटरनेटवर खूप सक्रिय आहे पण तिथे जे काही लिहिले जात आहे त्याचा मला त्रास होत नाही.'
गेल्या वर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि त्याचा सलामीचा जोडीदार मोहम्मद रिझवानने 13 चेंडू आणि 10 विकेट राखून 158 धावांचे आव्हान पार केले आणि सामना जिंकला. जागतिक स्पर्धेतील भारतीय संघाचा हा मोठा पराभव मानला गेला. (Yuzvendra Chahal)
गेल्या टी 20 वर्ल्ड कपनंतर भारत-पाकिस्तान दोनदा आमनेसामने आले. हे दोन्ही सामने आशिया चषक 2022 मध्ये खेळवण्यात आले. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट राखून पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात पाकने भारतीय संघाचा पराभव केला. आता पुन्हा एकदा या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. (Yuzvendra Chahal)
गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने भारतीय टॉप ऑर्डरला एकहाती तंबूचा रस्ता दाखवला होता. सध्या तो दुखापतीतून पुनरागमन करण्याच्या मार्गावर आहे. भारताविरुद्धच्या पुढील सामन्यात तो मैदानात उतरणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.