पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने शिवसेनेत फूट पडली आणि पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना (शिंदे) राज्यातील सत्तेत आली. त्यानंतर भाजपने राष्ट्रवादीत फूट पाडली आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. देशातील विविध राज्यांत असे विरोधकांत फूट पाडण्याचे राजकारण भाजपने केले आहे. फक्त भाजपच नाही तर जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हाही विरोधांत फूट पाडण्याच्या खेळी वेळोवेळी झालेल्या आहेत. पण यात निव्वळ राजकारण आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते मात्र चुकीचे आहे. जेवढे यात राजकारण आहे, तेवढाच यात गणिताचाही वाटा आहे. हे कसे ते आपण या लेखातून पाहू.
भारत हा अमेरिकेसारखा द्विपक्षीय व्यवस्था असलेला देश नाही. भारतात राजकीय पक्षांची संख्या जास्त आहे आणि ती वाढत चालेली आहे. समजा भारतात जर द्विपक्षीय व्यवस्था असती तर काय झाले असते? निवडणूक जिंकण्यासाठी एखाद्या पक्षाला ५० टक्केपेक्षा जास्त मते मिळवावी लागली असती. जर तीन पक्ष असतील तर निवडणूक जिंकण्यासाठी ३३ टक्केपेक्षा जास्त मते मिळवावी लागतील. भारतात बहुपक्षीय पद्धत असल्याने निवडून येणाऱ्या उमेदवाराल बऱ्याच वेळा ३० टक्केपेक्षाही कमी मते मिळालेली असतात.
भारतासारख्या देशात निवडणूक जिंकण्यासाठी जास्तीची मते मिळवण्यासाठी कष्ट करण्यापेक्षा विरोधीपक्षात फूट पाडणे जास्त सोईस्कर असते. त्यामुळे विरोधकांत फूट पाडून, नव्याने स्थापन होणाऱ्या पक्षाला सत्ताधारी पक्ष पैसेही पुरवतात, याला Seed Money असे म्हटले जाते. एक प्रकारे Divide And Rule म्हणजेच फोडा आणि राज्य करा, अशीची ही नीती असते.
भारतातील विरोधी पक्षांची वाढती संख्या, आणि विरोधकांतील दुफळी हे सत्ताधाऱ्यांच्या विजयामागील एक महत्त्वाचे कारण आहे. १९५२ ते १९६७ या काळात सत्ताधारी आणि मित्रपक्षांना ४७ टक्केपर्यंत मते मिळत असत, तर २०१४मध्ये सत्ताधारी आणि मित्रपक्षांना एकत्रित ३८ टक्के मते मिळाली होती. म्हणजे बहुरंगी लढतीचा थेट फायदा हा सत्ताधारी पक्षांना होताना दिसतो. अशा बहुरंगी लढतीत अपयशी ठरण्यापेक्षा निवडणूकपूर्व युती करण्याचे राजकारण विरोधकांना नीटस जमलेले नाही. अशा प्रकारची युती घडवून आणण्यात काँग्रेसपेक्षा भाजप सरस असल्याचे प्रणोय रॉय आणि दोराब सुपारीवाला यांनी त्यांच्या The Verdict या ग्रंथात म्हटले आहे.
विरोधी पक्षांच्या एकीचा निर्देशांक मोजता येतो, त्याला Index Of Opposition Unity (IOU) असे म्हटले जाते. भारतात केरळ राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी IOU हा देशात सर्वांत जास्त आहे आणि विशेष म्हणजे केरळमध्ये लहानसहान पक्षांची संख्याही जास्त आहे. केरळमधील राजकीय पक्ष निवडणुकांच्या आधीच युती करतात आणि मत विभागणी टाळतात. पण इतर राज्यांतील विधानसभा, तसेच देशपातळीवर लोकसभांच्या निवडणुकांत असे होताना दिसत नाही. भारतात सध्या ज्या लोकसभेच्या जागा जिंकल्या जातात यातील ४५ टक्के जागा या विरोधकांतील फुटीमुळे जिंकल्या गेलेल्या असतात, असे The Verdict मध्ये म्हटले आहे. त्यामुळे विरोधीपक्षांत एकजूट होऊ नये यासाठी राजकीय पक्ष धुर्त चाली खेळतात, तर बऱ्याच वेळा विरोधीपक्षांकडे एकत्र येण्याइतपत दूरदृष्टी नसते.
समजा IOU हा निर्देशांक १ने वाढला तर विरोधकांच्या जागांत ७ची भर पडू शकते. तर दुसरीकडे जर एखाद्या पक्षाने मतांची टक्केवारी १ टक्केने जरी वाढवली त्यांच्या जागांत १५ची भर पडू शकते, याला Swing असे नाव आहे. ज्या वेळी Swing १ टक्केनी वाढतो, त्या वेळी विरोधकांची मतेही १ टक्केंनी घटतात, पण प्रत्यक्षात मतदारांत असा Swing निर्माण करणे फार कठीण असते. जर या १ टक्के Swingचा पाडाव करायचा असेल तर IOUमध्ये ३ अंकाची वाढ व्हावी लागते.
हेही वाचा