Latest

Lasalgaon Onion Market : तब्बल १२ दिवसांनंतर लासलगावी कांदा लिलाव सुरू

गणेश सोनवणे

लासलगाव : पुढारी वृत्तसेवायेथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Onion Market) दीपावलीच्या तब्बल १२ दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी (दि. 20) कांदा लिलावास सुरुवात झाली असून, उन्हाळ कांद्याला कमाल ४५४५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर लाल कांद्याला ४१०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

जिल्ह्यातील विंचूर उपबाजार वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत कांदा विक्रीस अडचण झाली. सणासुदीत पैशांची गरज असताना लिलाव बंदमुळे दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, मोठ्या सुट्टीनंतर कांदा लिलाव सुरू झाल्याने बाजारपेठेत रेलचेल बघायला मिळाली. यंदा पावसाळ्यात पाऊस अत्यल्प बरसला आहे. यामुळे कांद्यासह इतर सर्वच महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. एकीकडे उत्पादनात घट आणि दुसरे शेतमालाला अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.(Lasalgaon Onion Market)

मार्च-एप्रिलमध्ये साठवलेला उन्हाळ कांदा हा खराब झाला आहे. त्यात नवीन लाल कांदाही कमी प्रमाणात बाजारात विक्रीस येत आहे. ६ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजार समितीत लिलाव झाले तेव्हा उन्हाळ कांद्याला कमाल ४००० रुपये, तर लाल कांद्याला कमाल ३५०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले होते. ६ नोव्हेंबरच्या तुलनेत सोमवारी कांदा कमाल दरात ५०० ते ६०० रुपयांची तेजी दिसून आली. येथील बाजार समितीत सोमवारी लाल कांद्याला कमीत कमी 1511, जास्तीत जास्त 4545, तर सरासरी 4000 रुपये भाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 4101, सरासरी 3300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले. (Lasalgaon Onion Market )

अपेक्षित बाजारभाव नाहीच 

शासनाने कांद्यासाठी किमान निर्यातमूल्य 800 डॉलर प्रतिटन वाढवण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याची निर्यात मंदावली आहे. तसेच किरकोळ बाजारात केंद्र शासनाच्या माध्यमातून कांदा 25 रुपये प्रतिकिलो या भावात विकला जात आहे. त्यामुळेही कांदा पुरवठा कमी असताना मागणी असूनही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT