मुंबईतील प्रदुषण कमी करण्यासाठी गरज पडल्यास कृत्रिम पाऊस पाडू : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

मुंबईतील प्रदुषण कमी करण्यासाठी गरज पडल्यास कृत्रिम पाऊस पाडू : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील स्वच्छता, वाढते प्रदूषण आणि धुळीच्या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२१) पाहणी केली. भल्या पहाटे मुंबईतील वांद्रे, सांताक्रूझ, जुहू या परिसराला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच मुंबईतील प्रदुषण कमी करण्यासाठी गरज पडल्यास कृत्रिम पाऊस पाडू, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील वाढते प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी रस्ते धुवून काढले जात आहेत. रस्त्याच्या कडेला साचणारी धूळ आणि माती काढण्यासाठी वापरण्यात येत असलेली स्वयंचलित वाहने आणि फॉग मशिन्स यांची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच ठिकठिकाणी स्वच्छता कामगारांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे, यासाठी काही उपयुक्त सूचना देखील केल्या.

“या कामाची सुरुवात वांद्रे येथील कलानगर परिसरातून करण्यात आली असली तरीही संपूर्ण मुंबईच आपल्याला साफ करायची” असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. मुंबई स्वच्छ करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कामगारांचीही त्यांनी आस्थेने चौकशी केली. त्यांच्या वसाहतींच्या कामाची प्रगतीही यावेळी जाणून घेतली. तसेच त्यांना या कामाचे महत्व पटवून देतानाच त्यांच्यासह चहा घेतला.

यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे तसेच मुंबई महानगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्वच्छता कामगार यावेळी उपस्थित होते.

Back to top button