बुलेट ट्रेनपेक्षाही वेगवान बहिरी ससाणा! | पुढारी

बुलेट ट्रेनपेक्षाही वेगवान बहिरी ससाणा!

न्यूयॉर्क : पेरेग्रीन हा बहिरी ससाणा जगातील सर्वात वेगवान पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याचा प्रतितास वेग 380 किमी इतका होऊ शकतो. हा वेग एखाद्या बुलेट ट्रेनच्या सर्वसाधारण वेगापेक्षाही अधिक आहे. या पक्षाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जपान व चीनमधील बुलेट ट्रेनचा सर्वसाधारण वेग अनुक्रमे प्रतितास 320 किमी व 316 किमी इतका असतो, हे येथे लक्षवेधी आहे.

तसे पाहता, जगभरात अनेक प्रकारचे पक्षी पहायला मिळतात, ज्यातील काही इतके मजबूत असतात की, त्यांच्या आसपासही कोणी पोहोचू शकत नाही. पेरेग्रीन हा बहिरी ससाणा देखील अशाच काही मोजक्या पक्षांपैकी एक आहे. त्याची उड्डाणाची क्षमता आणि सावज लिलया टिपण्याचे कौशल्य अतिशय नजरेत भरणारे आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या बहिरी ससाण्याचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून त्यातील त्याचा वेग निव्वळ थक्क करणारा आहे. पेरेग्रीन बर्‍याचदा पेलिकनसारख्या मोठ्या पक्षांवर देखील हल्ला करताना दिसून येतो. पेरेग्रीनचे शास्त्रीय नाव फॅल्को पेरेग्रीनस असे आहे. त्याला डक हॉक या नावाने देखील ओळखले जाते. या पक्षाची वाढ 59 सेंटीमीटर्सपर्यंत होऊ शकते आणि त्याचे वजन 330 ग्रॅमपासून एक किलोपर्यंत असू शकते.

हा बहिरी ससाणा प्रचंड वेगात असतानाही शिकार करू शकतो आणि हेच त्याचे ठळक वैशिष्ट्य आहे. या बहिरी ससाण्याची चोच अतिशय धारदार असते. त्यामुळे, वेगात असतानाही सावज शिताफीने पकडणे त्याला सहज शक्य होते. हा बहिरी ससाणा जितक्या वेगाने चोच मारेल, त्यावर किती सेकंदात सावज जागीच नेस्तनाबूत होणार, याची कल्पना येते.

Back to top button