शेवगाव; पुढारी वृत्तसेवा
चापडगावात अज्ञातांकडून गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला आहे. वाळू तस्करीच्या वादातून हा प्रकार झाल्याची माहिती समोर येत आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, तालुक्याच्या पुर्व भागात मोठी बाजारपेठ असणाऱ्या चापडगाव येथे आज (शनिवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बसस्थानका नजिक असणाऱ्या चौफुल्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी परमेश्वर उर्फ पप्पु बाळासाहेब पातकळ (वय २६) यांच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी परमेश्वर यांच्या हाताला चाटून गेली. मात्र परमेश्वर पातकळ यातुन बालंबाल बचावले.
सदर हल्लेखोर हे दोन दुचाकीवर गेवराईच्या दिशेने आले होते. या घटनेने चापडगाव व परिसरात भितीचे वातावरण तयार झाले असुन, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला, पंरतु त्या अगोदर हल्लेखोर फरार झाले होते.