बुलावायो; वृत्तसंस्था : सीन विल्यम्सच्या सलग दुसर्या शतकाच्या बळावर झिम्बाब्वेने पात्रता स्पर्धेतील लढतीत ओमानवर 14 धावांनी विजय मिळवत आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील पात्रता मिळवण्याच्या दिशेने जोरदार आगेकूच केली. सुपर सिक्स फेरीतील लढतीत झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 7 बाद 332 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात जोरदार संघर्ष केल्यानंतरही ओमानला 9 बाद 318 धावांवर समाधान मानावे लागले. (ODI WC 2023)
यजमान झिम्बाब्वेने साखळी फेरीतील पहिले चारही सामने जिंकले असून, सुपर सिक्स फेरीत 6 गुणांसह गटात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. विजयासाठी 333 धावांचे खडतर आव्हान असतानादेखील कश्यप प्रजापतीच्या शतकामुळे ओमानने जोरदार संघर्ष केला. मात्र, अगदी अंतिम क्षणी त्यांची निराशा झाली. (ODI WC 2023)
झिम्बाब्वेतर्फे सीन विल्यम्सने 103 चेंडूंत 142 धावांची आतषबाजी केली. या पात्रता फेरी स्पर्धेत सीन विल्यम्सचे हे दुसरे शतक ठरले. विल्यम्सने या स्पर्धेत आतापर्यंत 3 शतके झळकावली आहेत. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळेच झिम्बाब्वेने 7 बाद 332 धावांपर्यंत जोरदार मजल मारली. क्रेग एरविन (21) त्रिफळाचित झाल्यानंतर विल्यम्सने चौफेर फटकेबाजी केली. ओमानतर्फे फयाझने 79 धावांत 4 बळी घेतले.
विजयासाठी 333 धावांचे आव्हान असताना ओमानतर्फे सलामीवीर कश्यप प्रजापतीने 97 चेंडूंत 103 धावांसह शानदार शतक झळकावले. याशिवाय अकिबने 45, तर अयाझने 47 धावा केल्या. त्यांना 50 षटकांत 9 बाद 318 धावांवर समाधान मानावे लागले.
हेही वाचा;