पुणे : पुढारी वृत्तसेवा : मान्सून पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. तो पुढे सरकण्यासाठी कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, 23 व 24 रोजी कोकण, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मान्सूनचे वारे पुढे जाण्यासाठी कमी दाबाचे पट्टे तयार होणे गरजेचे असते. ते आता तयार होऊ लागले असून वार्याचा वेगही वाढला आहे. अरबी समुद्रासह लक्षद्वीप, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाले. त्यामुळे वार्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका झाला आहे. मान्सून सध्या रायचूर या भागात असून मंगळवारी त्याने दक्षिण भारतासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश या भागात प्रगती केली.
उत्तर भारतात प्रगती
राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड या भागांत कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनची दुसरी शाखा प. बंगालमधून बिहारमार्गे उत्तर भारतात सक्रिय होत आहे. त्या भागात पाऊस सुरू झाला, तर महाराष्ट्रावरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल, असा अंदाज आहे.एकीकडे मान्सूनसाठी वारे अनुकूल होत असताना दुसर्या बाजूला मात्र मध्य भारतात उष्णतेची लाटही सक्रिय होत आहे. देशाचा पूर्व भाग, मध्य भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात पारा 40 ते 44 अंशांवर राहील, असा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भात उष्णतेची लाट अजून पाच दिवस राहील.
हे ही वाचा :